बलात्काराचा आरोप झाल्यानंतर असलेले उत्तर प्रदेशचे मंत्री गायत्री प्रजापती अद्यापही मंत्रिमंडळात कायम कसे, असा प्रश्न राज्यपाल राम नाईक यांनी विचारला असून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून याबद्दल ‘स्पष्टीकरण’ मागितले आहे.

प्रजापती हे अद्याप मंत्रिमंडळात कायम असणे ही गंभीर बाब आहे. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याने आणि ते पळून जातील या भीतीने त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. असे असतानाही त्यांच्या मंत्रिमंडळात कायम राहण्यामुळे घटनात्मक नैतिकता व प्रतिष्ठा यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत, असे नाईक यांनी अखिलेश यादव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांना मंत्री म्हणून कायम ठेवण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण मागितले आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, प्रजापती हे देशातून पळून जातील या भीतीने त्यांच्याविरुद्ध ‘लुक-आऊट’ नोटीस जारी करण्यात आली असून त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर ते कॅबिनेट मंत्रिपदी कायम असणे गंभीर बाब असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.

स्वत: मुख्यमंत्र्यांनी प्रजापती यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी अद्याप असे केले नसून ते फरार आहेत ही गोष्ट आपल्या निदर्शनास आली आहे. ते दुसऱ्या देशात पळून जातील अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे, याकडे नाईक यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.