भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होणार? असा प्रश्न विचारला जात असताना जीडीपी घसरल्याची बातमी समोर आली आहे. २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट ५ टक्क्यांवर आला आहे. याआधी हा ग्रोथ रेट ५.८ टक्के होता. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचंच हे आकडे सांगत आहेत.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. मात्र आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीत हे आकडे समोर आले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण ८ टक्क्यांच्या वर होतं. गेल्या सहा वर्षातला हा सर्वात कमी जीडीपी आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

उत्पादन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर तूट झाली आहे. तर कृषी विकास दर ५.८ वरुन दोन टक्क्यांवर आला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार जीडीपीने गेल्या सहा वर्षांतला नीचांक गाठला आहे. याचा परिणाम शेअर बाजारावरही होऊ शकतो, असंही मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.