माझा केवळ नाईलाज होता म्हणून मी स्वत:ला भारतीय म्हणवून घेतले. मी जन्माने भारतीय नाही. माझ्यासाठी ती केवळ सक्ती असल्याचे वक्तव्य करून फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. गिलानी यांना वैयक्तिक कारणासाठी दुबईला जायचे असल्याने त्यांना पासपोर्टची गरज होती. त्यासाठी गिलानी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पासपोर्ट कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकत्वाच्या रकान्यात भारतीय असल्याची माहिती भरली. मात्र, मला केवळ पासपोर्ट मिळवण्यासाठी तसे लिहावे लागल्याचे गिलानी यांनी पत्रकारांना सांगितले. हुर्रियत प्रवक्त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना प्रत्येक काश्मिरी व्यक्तीला भारतीय पासपोर्टवरच प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले. त्यामुळेच गिलानींना भारतीय असल्याचे लिहावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितली. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून गिलानी यांनी भारतीय असल्याचे जाहीर करावे आणि देशविरोधी कारवायांसाठी माफी मागावी अशी मागणी केली होती.
यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयातर्फे गिलानी यांनी पासपोर्ट मिळविण्यासाठी केलेल्या अर्जात अपुरी माहिती दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना पासपोर्ट देण्यास नकार दर्शविण्यात आला होता.