एअरहॉस्टेस गीतिका शर्मा आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा आणि त्याच्याकडील महिला कर्मचारी अरुणा चढ्ढा यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. 
गोपाळ कांडाविरुद्ध बलात्कार, अमानवी शारीरिक संबंध, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट रचणे, फसवणूक करणे आदी आरोप ठेवण्यात येणार आहेत. माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही या दोघांवर आरोप ठेवण्यात येणार आहेत. कांडा याच्या एमएलडीआर एअरलाईन्समध्ये एअरहॉस्टेस म्हणून काम केलेल्या गीतिकाने गेल्यावर्षी पाच ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. कांडा आणि चढ्ढा या दोघांनी केलेल्या छळवणुकीमुळेच आत्महत्या करीत असल्याचे पत्र गीतिकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवले होते. या घटनेनंतर कांडा यांनी हरियाणातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.