राजस्थानात गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत सरकारला झटका देण्याची तयारी केली होती. पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलट गेहलोत यांनीच सचिन पायलट यांच्या गोटातील चार आमदारांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेहलोत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली असून १०३ आमदारांच्या समर्थनाचे पत्रही दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गहलोत शनिवारी सांयकाळी राज्यपालांची भेट घेत १०३ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले आहे. पण, अद्यापपर्यंत राजभवनाकडून ही फक्त एक सदिच्छा भेट होती, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, राज्यपाल आणि गहलोत यांच्या भेटीमुळे राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर येत्या बुधवारी विशेष विधानसभा अधिवेशन बोलवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

काँग्रेसचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी १०३ आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे. यामध्ये काँग्रसचे ८८ आमदार आहेत. याशिवाय एक अपक्ष आणि बीटीपी दोन आणि सीपीएम दोन आरएलडी एक अशा आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, अशोक गेहलोत यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यास राज्य सरकारवरील संकट दूर होईल. शिवाय बंड करणाऱ्या १९ आमदारांवर थेट कारवाई करण्याचा मार्गही मोकळा होईल.