21 November 2017

News Flash

पेसमेकरचे काम करणाऱ्या पेशी तयार करण्यात यश

हृदयरुग्णांना जो पेसमेकर बसवला जातो, त्याच्याऐवजी आता हृदयाच्या पेशींना नैसर्गिक जनुकाचे इंजेक्शन देऊन पेसमेकरचे

लॉसएंजल्स, १७ डिसेंबर/पीटीआय | Updated: December 17, 2012 5:42 AM

हृदयरुग्णांना जो पेसमेकर बसवला जातो, त्याच्याऐवजी आता हृदयाच्या पेशींना नैसर्गिक जनुकाचे इंजेक्शन देऊन पेसमेकरचे काम करणाऱ्या पेशी तयार करण्यात आल्या आहेत, असे वैज्ञानिकांनी सांगितले. 
हृदयाच्या नैसर्गिक पेशीत काही बदल करून त्यांचे रूपांतर जैविक पेसमेकरमध्ये केले आहे. यात एका जनुकाचे इंजेक्शन देऊन या पेशींना हवे तसे बदलण्यात यश आले आहे, असा संशोधकांचा दावा आहे.
सेडार-सेनाई हार्ट इन्स्टिटय़ूटच्या वैज्ञानिकांनी पेसमेकरच्या पेशी तयार करताना टीबीएक्स १८ या जनुकाचा वापर केला आहे. हृदयाचे ठोके अनियमित पडत असतील तर अशा दोषांसाठी पेसमेकरऐवजी यापुढे जैविक उपचारपद्धती वापरली जाऊ शकते.
यापूर्वीही प्राथमिक स्वरूपाचे जैविक पेसमेकर तयार करण्यात आले आहेत, परंतु एका जनुकाचा वापर करून हृदयाच्या स्नायूंच्या पेशींपासून पेसमेकर तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा जैविक पेसमेकर म्हणजे जैविक पेशीच असून त्यांच्या मदतीने हृदयाला विद्युतलहरींनी उद्दिपित केले जाते. हृदयाच्या नैसर्गिक पेशीही पेसमेकरचे काम करीत असतात. त्यांच्यात बिघाड झाल्यास कृत्रिम पेसमेकरचा वापर करावा लागतो. परंतु या नवीन पेशी या नैसर्गिक पेसमेकरसारख्या काम करतात. हृदयात एकूण १० अब्ज पेशी असतात व त्यातल्या १० हजार पेशी पेसमेकरचे काम करीत असतात. नेचर बायोटेक्नॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
टीबीएक्स १८ जनुकाच्या मदतीने बदल केलेल्या पेशी इनडय़ुसड सॅन सेल्स म्हणून ओळखल्या जातात. टीबीएक्स १८ हा जनुक एका विषाणूमार्फत पेशीत पाठवला जातो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूच्या पेशी कार्डिओमायोसाइट्स या पेसमेकर पेशीत रूपांतरित होतात. यात कर्करोगाच्या पेशी त्यात मिसळल्या जाण्याचा धोका असतो.

First Published on December 17, 2012 5:42 am

Web Title: gene turns heart cells into pacemaker