१५ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत-चीन सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंधही कमालीचे ताणले गेले. चीन सैन्यानं भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्ष झाला, असं सरकारनं म्हटलं होतं. मात्र, केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी संघर्षाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. त्याचबरोबर दोन्ही सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाच्या कारणाची विचारणा विरोधी पक्षांकडून मोदी सरकारकडं केली जात होती. त्यावर सरकारनं सर्व पक्षीय बैठक घेऊन खुलासा केला होता. चिनी सैन्यानं घुसखोर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा संघर्ष झाल्याचं सरकारनं म्हटलं होतं. मात्र, गलवान व्हॅलीतील संघर्षाचं मूळ कारण वेगळेच असल्याचं व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे.

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना व्ही.के. सिंह म्हणाले, “लेफ्टनट जनरल स्तरावरील लष्करी चर्चेत भारत व चीनमध्ये हा निर्णय झाला होता की, सीमेजवळ जवान राहणार नाही. पण, त्यानंतर १५ जूनच्या सायंकाळी कमांडिंग ऑफिसर सीमेवर टेहाळणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना असं दिसलं की पूर्ण चिनी सैन्य परत गेलेलं नाही. पीपी १४ जवळ चिनी सैन्याचा तंबू तसाच होता. त्यानंतर कमांडिंग ऑफिसरनं चिनी सैन्याला तंबू हटवण्यास सांगितलं. चिनी सैन्य तंबू काढत असतानाच अचानक आग लागली. भारतीय जवानांनी आग लावली, असं चिनी सैन्याला वाटलं. त्यानंतर दोन्ही देशातील जवानांमध्ये झडप झाली. या संघर्षात भारतीय जवान चिनी सैन्यावर वरचढ ठरले. दोन्ही देशांनी अधिकची कुमक बोलावली. या हिंसक संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त जवान मारले गेले, ही गोष्ट खरी आहे,” असा दावा सिंह यांनी केला आहे.