27 February 2021

News Flash

शीख, साधूबाबा आणि बडोदा डायनामाइट खटला; आणबाणीच्या काळातील जॉर्ज फर्नांडिस यांचा लढा

सीबीआयने २४ सप्टेंबर १९७६ रोजी जॉर्ज आणि अन्य २४ आरोपींविरोधात जवळपास ६०० साक्षीदारांची यादी व ६०० कागदपत्रांसकट तीन हजार पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले.

जयप्रकाश नारायण यांच्या आग्रहावरून जॉर्ज बिहारमधील मुज्जफरपूरमधून लोकसभेसाठी जेलमधूनच नामांकनपत्र भरून निवडणुकीत उभे राहिले.

२५ जून १९७५… याच दिवशी इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली…. या आणीबाणीच्या काळात सरकारी दमनशाहीविरोधात जॉर्ज फर्नांडिस यांनी अक्षरश: योद्धा सारखा लढा दिला. सरदारजी, साधूबाबाचे रुप धारण करत त्यांनी इंदिरा गांधी यांची हुकूमशाही मोडून काढली होती. आणीबाणीच्या काळातील पोस्टरबॉय अशी ओळख फर्नांडिस यांनी निर्माण केली होती. त्यांच्या या लढ्याचा घेतलेला आढावा…

कधी साधूबाबा तर कधी शीख
इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर करून राज्यघटना, संसद, मानवाधिकार, वृत्तपत्रस्वातंत्र्य, कामगारांचा संपावर जाण्याचा अधिकार स्थगित करून रातोरात विरोधी पक्षांचे संसद सदस्य, राजकीय नेते, कामगार नेते, विद्यार्थी नेते, वकील, विद्यार्थी, शिक्षक अशा हजारो लोकांना अटक करून जेलमध्ये टाकले. सुमारे दीड लाख लोकांना ‘मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट’ (मिसा) आणि ‘डिफेन्स ऑफ इंडिया रुल्स’ (डीआयआर) खाली विनाचौकशी तुरुंगात टाकण्यात आले होते. गुप्तचर विभाग, पोलीस तसेच सबंध सरकारी यंत्रणेने हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही जॉर्ज फर्नाडिस यांना अटक करण्यात यश आले नाही. आणीबाणी घोषित झाल्यावर जॉर्ज यांनी भूमिगत होऊन इंदिरा सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते वेशांतर करायचे. दाढी वाढवून सरदारजी किंवा साधूबाबाचे रूप धारण करून भूपिंदर सिंग, बी. पी. सिंग, एम. एस. दुग्गल या नावांनी ते कार्यकर्त्यांना भेटायचे. शीख व साधूच्या वेशात त्यांचे निकटचे कार्यकर्तेसुद्धा त्यांना ओळखू शकत नव्हते.

बडोदा डायनामाइट केस
आणीबाणीच्या काळात डायनामाइट अर्थात सुरुंगचा वापर करण्याचा निर्णय जॉर्ज फर्नांडिस यांनी घेतला होता. बडोदा येथे एका खाणीतून सुरुंग मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. बडोद्यातील टिंबरोड खाणीत डायनामाइटच्या स्फोटाचा काय परिणाम होऊ शकतो हे जॉर्ज यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिले. त्यानंतर टिंबरोड खाणीतून मोठय़ा प्रमाणावर सुरुंगाच्या कांड्या, तसेच वासुदेव अँड कंपनी (हालोल) कडून डायनामाइटचा स्फोट करण्यासाठी लागणारे डिटोनेटर्स आणि फ्यूज वायर मिळवण्यात आली. डायनामाइट मिळवल्यानंतर ते मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मार्फत पाठविण्यात आले. अशा तऱ्हेने सुरुंग वापरून त्यांचे स्फोट घडवण्याअगोदर जॉर्ज फर्नाडिस यांनी सर्व संबंधित कार्यकर्त्यांना आपले आंदोलन हे अहिंसात्मक असून कोणत्याही व्यक्तीचा जीव या स्फोटांत जाता कामा नये अशी स्पष्ट ताकीद दिली होती. त्यानंतर मुंबई, नाशिक सब-जेल, दिल्ली, बिहार, गुजरात, कर्नाटकमधील रेल्वे स्टेशन, रेल्वेचे पूल, रेल्वेरूळ, मुंबईतील एअर इंडिया इमारत, ब्लिट्झ साप्ताहिक कार्यालय अशा देशभरातील जवळपास ५० ठिकाणी ऑक्टोबर १९७५ ते जून १९७६ या काळात डायनामाइटचे स्फोट घडवून आणीबाणीविरुद्ध तीव्र आंदोलन आंदोलन करण्यात आले.

अखेर फर्नांडिस तुरुंगात गेले
एप्रिल १९७६ मध्ये ज्यांच्यामार्फत डायनामाइट मिळवण्यात आले होते त्यांच्या एका नातेवाईकाने पोलिसांना खबर दिल्यामुळे या प्रकरणी पहिली अटक झाली. तसेच बडोद्यात डायनामाइट पकडण्यात आले. त्यानंतर देशाच्या निरनिराळ्या भागांत काही आरोपींची धरपकड करण्यात आली आणि अखेरीस जून १९७६ मध्ये जॉर्ज यांनाही कोलकात्याला पकडण्यात आले. मुंबई पोलिसांनी जुलै १९७६ मध्ये मुंबईतील संबंधित आरोपींना पकडले. या आरोपींनी फर्नांडिस यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची तयारी दर्शवली. या प्रकरणातील सर्व आरोपींना तिहारमधील तुरुंगात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

तीन हजार पानांचे आरोपपत्र
प्रमुख महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सीबीआयने २४ सप्टेंबर १९७६ रोजी जॉर्ज आणि अन्य २४ आरोपींविरोधात जवळपास ६०० साक्षीदारांची यादी व ६०० कागदपत्रांसकट तीन हजार पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले. साक्षीदारांच्या यादीत जॉर्ज यांच्याबरोबर काम केलेले काही नेते व कार्यकर्त्यांची नावेही समाविष्ट होती. या आरोपपत्रानुसार जॉर्ज आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२१ अ व १२० ब, विस्फोटक पदार्थ अधिनियमाचे कलम ४, ५, ६ आणि भारतीय विस्फोटक अधिनियम कलम (३ ब) आणि (१२) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. तिहार जेलपासून तीस हजारी कोर्ट सुमारे १३ कि. मी. अंतरावर होते. आठवड्यातून तीन-चार दिवस आरोपींना कोर्टात नेले जाई. पोलीस जॉर्जसकट सर्वाना बेड्या व साखळदंडात अतिसुरक्षा व्यवस्थेत तीन बसेस व तीन व्हॅनमधून कोर्टात न्यायचे.

‘आप इस जंजीर को तोड सकते है’
१९७७ च्या जानेवारीत इंदिरा गांधींनी मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक घेण्याचे जाहीर केले. जानेवारीअखेरीस देशभरातील निरनिराळ्या जेलमध्ये असलेले सर्व विरोधी पक्षनेते व कार्यकर्त्यांना मुक्त करण्यात आले. पण बडोदा डायनामाइट प्रकरणातील आरोपींना मात्र सरकारने शेवटपर्यंत सोडले नाही. भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष आणि स्वतंत्र पक्ष अशा विविध पक्षांचे जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली विलीनीकरण करून नवा जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. जयप्रकाश नारायण यांच्या आग्रहावरून जॉर्ज बिहारमधील मुज्जफरपूरमधून लोकसभेसाठी जेलमधूनच नामांकनपत्र भरून निवडणुकीत उभे राहिले. त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांना बेडय़ा घालून साखळीने बांधलेला त्यांचा फोटो पोस्टर्सवर झळकविण्यात आला. या पोस्टरवर जनतेसाठी जॉर्जचे आवाहन होते.. ‘आप इस जंजीर को तोड सकते है!’

…आणि फर्नांडिस मंत्री झाले
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत फर्नांडिस यांनी मुज्जफरपूर मतदारसंघातून त्यावेळचे काँग्रेसचे बलाढ्य नेते दिग्विजय नारायण सिंह यांना तब्बल ३ लाख ३४ हजार मतांनी पराभूत करून जागतिक विक्रम नोंदवला. दुसऱ्या दिवशी २१ मार्च १९७७ रोजी जॉर्ज आणि इतरांना बेडय़ा व साखळदंडांत तीस हजारी कोर्टात नेण्यात आले असता हजारो लोक कोर्टात जमले होते. आणि कोर्टाच्या आवारात पोलिसांच्या उपस्थितीत लोकांनी जॉर्जच्या बेड्या व साखळदंड अक्षरश: तोडून काढले. जनता पार्टी व मोरारजी देसाई यांना जॉर्ज फर्नाडिस हे कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात हवे होते. परंतु ते जेलमध्ये होते. ते आणि त्यांच्या सर्व साथींना जेलमधून जोवर मुक्त करत नाहीत, तोपर्यंत ते मंत्रिपद स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका जॉर्ज यांनी मांडली. अखेर २२ मार्च १९७७ रोजी जॉर्ज व इतर आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आणि २६ मार्च १९७७ रोजी डायनामाइट प्रकरण मागे घेण्यात आले आणि जॉर्ज थेट कोर्टातून राष्ट्रपती भवनात केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी गेले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 11:10 am

Web Title: george fernandes battle during emergency baroda dynamite case sikh sadhu
Next Stories
1 फर्नांडिस म्हणाले स्फोट झाला आणि मुलायमसिंह पहातच राहिले!
2 Ram Janambhumi Babri Masjid land Case : वादग्रस्त जागा वगळता उर्वरित जागेवरील स्थगिती हटवावी: केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका
3 ‘फर्नांडिस यांनी भारताला सुरक्षित आणि शक्तीशाली बनवले’, मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X