दिग्गज समाजवादी नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नवी दिल्ली येथील सरकारी निवासस्थानी सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ जून १९३० रोजी कर्नाटकात जन्म घेतलेल्या फर्नांडिस यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात कामगार नेता म्हणून केली. त्यानंतर ते देशाचे संरक्षण मंत्री झाले.

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म भलेही कर्नाटकात झाला असली तरी त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आणि बिहार राहिली. हिंदी, इंग्रजी, तमिळ, मराठी, कन्नड, उर्दू, मल्याळी, तेलुगू, कोकणी आणि लॅटिन भाषा येत असत. ते एक विद्रोही नेते होते. त्यांच्या राजकीय प्रवासवर एक नजर टाकूयात..

जॉर्ज फर्नांडिस यांना पाद्री करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बंगळुरूला पाठवले होते. पण ते मुंबईला आले आणि कामगार संघटनांशी जोडले गेले. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात मुंबईतील एका कामगार संघटनेचा नेता म्हणून केली. १९५० आणि ६० च्या दशकात कामगार नेता म्हणून त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांनी १९६७ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते स का पाटील यांचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभव केला. दक्षिण मुंबई पाटील यांचा बालेकिल्ला होता. या विजयानंतर ‘जायंट किलर’ नावाने फर्नांडिस प्रसिद्ध झाले.

१९७४ मध्ये रेल्वे संपानंतर ते बलाढ्य नेता म्हणून समोर आले. ते सुमारे ४ दशके मुंबईच्या कामगार संघटनेत सक्रिय होते. समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते.

आणीबाणीच्या काळातील जॉर्ज फर्नांडिस यांच्या संघर्ष जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
शीख, साधूबाबा आणि बडोदा डायनामाइट खटला; आणबाणीच्या काळातील जॉर्ज फर्नांडिस यांचा लढा