पोखरण येथील अणूचाचण्या या भारतासाठी अभिमानाचा क्षण होता. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताची ओळख एक अण्वस्त्रधारक देश म्हणून झाली होती. या चाचण्या झाल्या त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. या अणू चाचण्यांशी संबंधीत अनेक छोटे-मोठे किस्से सांगतले जातात. असाच एक किस्सा तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये घडला होता. जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी (दि.२९) सकाळी दिल्लीत निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांची आठवण सांगण्याचा हा प्रयत्न.

जॉर्ज फर्नांडिस आणि मुलायमसिंह यादव हे दोन्ही समाजवादी नेते. मात्र, फर्नांडिस हे भाजपासोबत सत्तेत असल्याने या दोघांना भाजपाने वेगळे केले होते. वाजपेयींच्या सरकारआधी इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रीमंडळात मुलायमसिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. दरम्यान, ११ मे १९९८ मध्ये राजस्थानातील पोखरण येथे अणू चाचण्या झाल्या. या चाचण्या करण्यात येत असल्याची बाब कमालीची गुप्त ठेवण्यात आली होती. इतर देशांपासूनच नव्हे तर देशांतर्गतही याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

अणू चाचण्यांनंतर काही वेळातच संसदेत फर्नांडिस आणि मुलायमसिंह यादव याची भेट झाली. त्यावेळी त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. मुलायमसिंह यांनी फर्नांडिसांना सहजच विचारले काय चाललंय? त्यावर फर्नांडिस यांनी उत्तर दिले, स्फोट झालाय! त्यांच्या या अनपेक्षित उत्तराने मुलायमसिंह क्षणभर गोंधळले आणि म्हणाले स्फोट? त्यानंतर फर्नांडिस यांनी छोटेखानी उत्तर दिले, होय स्फोट…अणू स्फोट जे काम आपण करु शकला नाहीत. यावर मुलायम यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते.

मात्र, विरोधक असल्याने मुलायमसिंह यांनी अणू चाचणीवरुन त्यांनी संसदेत भाजपावर टीका केली आणि म्हणाले, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की या लोकांना सरकार स्थापन करु देऊ नका. सभागृहात आम्ही सार्वजनिक वितरण प्रणालीवर चर्चा करीत राहिलो आणि यांनी पहा हे काय केलं.