28 September 2020

News Flash

जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश : अमेरिकेचा उत्तम ‘सीईओ’

एकीकडे सोविएत रशियाचे विसर्जन होत असताना अमेरिका त्या वेळी महाशक्ती म्हणून उदयास येत होता.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यभ जॉर्ज एच. डब्ल्यू.  बुश आणि सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांची माद्रिद (स्पेन) येथील सोव्हिएत वकिलातीत २९ ऑक्टोबर १९९१ रोजी झालेली भेट.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सिनीयर हे १९८९ मध्ये देशाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्या देशाची वाटचाल वेगळ्या दिशेने सुरू झाली. ४१ वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होण्यापूर्वी ते रोनाल्ड रेगन यांच्यासमवेत आठ वर्षे उपाध्यक्ष होते. उपाध्यक्षाला पुढे जाऊन अध्यक्षपद मिळण्याची दीडशे वर्षांतील ही पहिलीच घटना.

एकीकडे सोविएत रशियाचे विसर्जन होत असताना अमेरिका त्या वेळी महाशक्ती म्हणून उदयास येत होता. त्यातच बुश यांच्या धोरणांनी उर्वरित जगात अमेरिकेची विश्वासार्हता वाढवली व व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचे भूत गाडण्याचा प्रयत्न केला. देशांतर्गत गोष्टींकडे त्यांनी काहीसे दुर्लक्ष केले असा एक आरोप त्यांच्यावर होता, कर न वाढवण्याचे आश्वासन ते पाळू शकले नव्हते. त्यानंतर १९९२ मध्ये देशाची सूत्रे बिल क्लिंटन यांच्याकडे गेली.

जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांचा जन्म मॅसॅच्युसेट्समधील मिल्टन येथे झाला, गुंतवणूक बँकरचे ते पुत्र होते. अमेरिकी नौदलात त्यांनी पर्ल  हार्बरच्या हल्ल्यानंतर वैमानिक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना पॅसिफिकमधील कामगिरी देण्यात आली. वयाच्या अठराव्या वर्षी ते वैमानिक झाले. टॉर्पेडो बॉम्बर विमानांचे सारथ्य त्यांनी केले होते. त्यांनी १९४४ मध्ये हवाई हल्ल्यांच्या वेळी त्यांचे विमान पाडले गेले, त्या वेळी त्यांच्या जिवावर बेतले होते.

१९४५ मध्ये नौदलातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा विवाह बार्बरा बुश यांच्याशी झाला. त्यांना सहा मुले होती. पहिला मुलगा जॉर्ज वॉकर बुश (ज्युनियर) नंतर देशाचा अध्यक्ष झाला. कला शाखेत पदवी घेतल्यानंतर कालांतराने बुश (सीनीअर) टेक्सासला गेले. वडिलांच्या उद्योग संबंधांचा वापर करून त्यांना तेल उद्योगात नोकरी मिळाली. वयाच्या चाळिशीत ते अब्जाधीश झाले. त्यांच्या  मुलीच्या अकाली मृत्यूने त्यांना धक्का बसला. नंतर जॉर्ज बुश राजकारणाकडे वळले. रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक शाखेचे नेतृत्व केल्यानंतर त्यांना टेक्सासमधून सिनेटची उमेदवारी मिळाली,मात्र  त्यात त्यांना यश आले नाही, नंतर १९६६ मध्ये त्यांना प्रतिनिधिगृहाची उमेदवारी मिळाली. नंतर ते दोनदा निवडून आले. १९७० मध्ये रिचर्ड निक्सन यांनी पुन्हा त्यांना सिनेट लढवण्यास सांगितले, पण तेव्हाही त्यांचा पराभव झाला. नंतर निक्सन यांनी त्यांची नेमणूक अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून केली. निक्सन यांना १९७४ मध्ये राजीनामा द्यावा लागल्यानंतर बुश यांनी वॉटरगेट प्रकरणाच्या जखमा भरण्यासाठी देशाचा दौरा करून रिपब्लिकन उमेदवारांची उमेद वाढवली. नंतर ते बीजिंगला दूतावासात गेले.

त्यानंतर अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांनी त्यांना माघारी बोलावून सीआयएचे प्रमुख केले. त्या वेळी सीआयएपुढे  हेरगिरीची अनेक प्रकरणे होती. १९७८ मध्ये त्यांनी १९८० मध्ये रिपब्लिकन पक्षाची अध्यक्षीय उमेदवारी निवडणूक लढवली. देशभरात त्यांनी प्रचार केला व रोनाल्ड  रेगन यांना आव्हान दिले. पण रेगन यांनी त्यांना पराभूत करून देशाचे उपाध्यक्षपद बुश यांना दिले. आठ वर्षे ते उपाध्यक्ष होते. १९८९ मध्ये ते अध्यक्षीय निवडणुकीत यशस्वी झाले. त्या वेळी त्यांनी कर वाढवणार नाही असे आश्वासन दिले होते. ते अध्यक्ष झाल्यानंतर जगात पुन्हा स्वातंत्र्याची झुळूक पाहायला मिळाली. १९९० मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्या वेळी बुश यांनी सद्दाम हुसेन विरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उभी केली. सद्दामवर कारवाई करण्यासाठी त्यांनी रीतसर संयुक्त राष्ट्रांच्या संमतीची वाट पाहिली होती. या युद्धात अमेरिकेचा विजय झाला. आखातातील हे युद्ध शंभर तासात संपले, पण सद्दाम सत्तेवर राहिला.  असे असले तरी बुश यांचे स्थान उंचावले.

त्या वेळी त्यांची लोकप्रियता ९० टक्क्य़ांच्या आसपास होती. पण देशातील आर्थिक स्थिती , दुसऱ्या महायुद्धानंतरची दीर्घकाळ रेंगाळलेली मंदीसदृश अवस्था याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर त्यांनी देशात कर वाढवले, त्यामुळे लोक रागावले होते. पुढच्या निवडणुकीत बिल क्लिंटन अध्यक्ष झाले व त्यांनी अमेरिकेला नवी दिशा दिली. सरतेशेवटी पार्किन्सनमुळे त्यांना व्हीलचेअर वापरावी लागत होती. महिलांशी लगट केल्याचा आरोप त्यांच्यावरही झाला होता, पण त्यांनी तो फेटाळला. पण जर असे काही घडले असेल तर माफी मागतो असेही जाहीर करून टाकले. अमेरिकेचे एक उत्तम सीइओ म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. ते प्रेरणादायी नेत्यापेक्षा उत्तम व्यवस्थापक होते. इव्ही लीगशी संबंधामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा डागाळली होती.

कुवेतमधील विजयाने त्यांचे परराष्ट्र धोरण यशस्वी ठरले. कम्युनिझमचा पाडावही त्यांनी उत्तम हाताळला. आर्थिक पातळीवर मात्र त्यांच्या धोरणांवर टीका झाली. राजकारण असंस्कृत व वाईट असू नये असे त्यांचे सांगणे होते व ते पावित्र्य त्यांनी जपले होते.

राजकीय जीवनपट

  • १९६६- प्रतिनिधिगृहावर निवड
  • १९७० संयुक्त राष्ट्रात राजदूत
  • १९७४- बीजिंग दूतावासात नेमणूक
  • १९७६- सीआयएचे संचालक
  • १९८१-८९- अमेरिकेचे उपाध्यक्ष
  • १९८९ ते १९९३ अमेरिकेचे अध्यक्ष (पहिले आखाती युद्ध, सोविएत युनियनचे पतन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 12:12 am

Web Title: george h w bush
Next Stories
1 जीएसटी संकलनाचे लक्ष्य हुकले
2 आसाममध्ये इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये स्फोट, ११ जण जखमी
3 नोव्हेंबरमध्ये ९७,६३७ कोटी GST कर संकलन, ऑक्टोंबरच्या तुलनेत घसरण
Just Now!
X