जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी पदत्यागाचे संकेत दिले आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर म्हणून त्यांचा कार्यकाल २०२१ साली संपत आहे. त्यानंतर आपण पायउतार होऊ आणि पुन्हा या पदासाठी निवडणूक लढवणार नाही, असे मर्केल यांनी सांगितले.

मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) या राजकीय पक्षाचे डिसेंबरमध्ये अधिवेशन भरत आहे. त्या वेळी पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान होईल. पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही आपण भाग घेणार नसल्याचे मर्केल यांनी स्पष्ट केले.

आज नवा अध्याय सुरू करण्याची वेळ आहे. पक्षाला आणि देशाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे सरकारला नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल,असे मर्केल यांनी सोमवारी त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना सांगितले. मर्केल यांचे आघाडी सरकार सध्या अनेक संकटांतून जात असताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.