‘जर्मनविंग्ज’च्या विमानाच्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर, तणावग्रस्त कनिष्ठ वैमानिकांना कॉकपिटमध्ये तैनात करण्यात येत असल्याच्या मुद्दय़ाकडे लक्ष द्यावे असे आवाहन एअर इंडियातील वैमानिकांच्या संघटनेने नागरी हवाई सेवा महासंचालकांना (डीजीसीए) केले आहे.सुमारे ३० सहवैमानिकांना (को-पायलट) कुठलाही मोबदला न देता जादा वेळ काम करण्यास ‘भाग पाडले जात आहे’. अतिशय मानसिक तणावात असलेल्या व आर्थिक बोज्याखाली असलेल्या या सहवैमानिकांना कॉकपिटमध्ये तैनात करणे हे संकटाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशनने (आयसीपीए) डीजीसीएला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एअर इंडियातील ए-३२० एअरबसचे सारथ्य करणाऱ्या वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने गेल्या १० दिवसांत दुसऱ्यांदा हा धोक्याचा इशारा दिला आहे.