जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. १९८२ ते १९९८ या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हेलमट कोल यांचा जन्म ३ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६ च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटीक युनियनमध्ये ते सामील झाले. १९९० च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व- पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. १९८२ ते १९९० या कालावधीत कोल हे पश्चिम जर्मनीचे चान्सलर होते. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९० ते १९९८ ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक काळ (१६ वर्ष) राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने विकासाच्या दिशेने वाटचाल केली.

युरोपीय महासंघामध्येही कोल यांचे योगदान अतुलनतीय होते. २० व्या शतकाच्या पूर्वाधात ते युरोपीय महासंघातील एक प्रमुख नेते म्हणून उदयास आले. जर्मनीच्या विद्यमान चान्सलर अँजेला मर्केल यांचे राजकारणातील गुरु म्हणून ते ओळखले जातात. मर्केल यांना १९९१ मध्ये कोल यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. विशेष म्हणजे मर्केल यांनीच हेलमट यांनी चान्सलर पदावर असताना केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा आला होता. २००२ मध्ये कोल यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनीही कोल यांच्या युरोपमधील योगदानाचे भरभरुन कौतुक केले होते. हेलमट यांच्या निधनावर जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.