जर्मनीतील म्यूनिक शहरात चाकू हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेचा दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का याचा तपास सुरु आहे.

म्यूनिक शहरात शनिवारी सकाळी एका हल्लेखोराने रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले. हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या हल्लेखोराचा शोध सुरु असून घटनास्थळाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हल्लेखोर हा सुमारे ३५ ते ४० या वयाचा असावा. हल्ल्यानंतर तो काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन पळाला आहे. म्युनिक पोलीस त्याचा शोध घेत आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी झालेल्या चौघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या प्रकृतीला धोका नाही, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

जुलै २०१६ मध्येही म्युनिक शहर हल्ल्याने हादरले होते. शहराच्या मध्यवर्ती मॉलमध्ये अंदाधूंद गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या १८ वर्षीय हल्लेखोराकडे दोन देशाचे नागरिकत्व होते. या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला होता.