बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येथील राजकीय वातावरण आता अधिकच तापत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर निववडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, लालू प्रसाद यादव यांनी ट्वटिद्वारे एक घोषणा देखील दिली आहे.

लालू प्रसाद यादव यांनी, बिहारी माणसाला तयारीला लागण्याचे आवाहान केले असून, आता जनतेचे राज्यं येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, बिहारमध्ये आता बदल घडणार असल्याचेही त्यांनी ट्वटिद्वारे म्हटले आहे.

आणखी वाचा- बिहार निवडणूक : लोक जनशक्ती पार्टी ‘एनडीए’मध्ये असणार की नाही? नितीश कुमार म्हणाले…

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

मागील वेळी २०१५ मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यात लालूंच्या पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या होत्या. जनाता दल ७१, भाजप ५३ तर काँग्रेस २७ जागा मिळाल्या होत्या.

आणखी वाचा- करोना काळ असला तरीही बिहार पुन्हा जिंकणारच, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर, करोनाच्या आपत्तीमुळे जग पूर्ण बदलून गेले असून, नव्या परिस्थितीत आयुष्यातील घडामोडींचा विचार करावा लागत आहे. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणूक ही जगभरातील मोठी निवडणूक असेल. लाखो विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा दिल्या आहेत. लोकांचे आरोग्य सांभाळून लोकप्रतिनिधींची निवडप्रक्रिया पार पाडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे.