दिल्ली पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलच्या १४ वर्षांच्या मुलाने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. गाझियाबादमधील विजयनगर भागात हा प्रकार घडला.
पीडित मुलीचे कुटुंबीय हे संबंधित मुलाच्या वडिलांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. पीडित मुलीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा आणि रक्त दिसल्यानंतर हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला, असे पोलिसांनी सांगितले. ती मुलगी सध्या इयत्ता पहिलीत शिकत आहे. घरामध्ये ती एकटी असताना संबंधित मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीचे वडील नोएडामध्ये नोकरी करतात. याप्रकरणी विजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी करण्यास पाठवले आहे.