ग्रेटर नोएडा येथील शाहबेरी गावातील दोन इमारती कोसळल्याचे वृत्त ताजे असतानाच गाझियाबाद येथील मसुरी परिसरातील निर्मिती अवस्थेतील एक इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत किमान १० ते ११ लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रूपये तर जखमींना ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मसुरीतील मिसलगडी येथील घटना आहे. डासना रेल्वे पुलाजवळील एक ५ मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर दबले गेल्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर लगेच ५ लोकांना सुरक्षित काढण्यात यश आले. यामध्ये २ मुलांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या गीता नावाच्या एका महिलेने तिचा पती आणि ८ वर्षीय मुलासह संपूर्ण कुटुंब आत फसल्याचे सांगितले.

दरम्यान, ग्रेटर नोएडा येथील शाहबेरी येथे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास इमारत कोसळली होती. चार दिवस चाललेल्या बचाव कार्यादरम्यान १० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर शनिवारी नोएडातील सेक्टर ६३ येथे एक निर्मितीअवस्थेतील इमारत कोसळली होती. यामध्ये २ लोकांचा मृत्यू झाला होता.