देशभरामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही करोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. असं असतानाच सरकारी यंत्रणा सज्ज आहे, पुरेश्या आरोग्य सेवा उपलब्ध आहेत असे दावे उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र गाझियाबादमधील सरकारी रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. येथील संजय नगरमधील सरकारी रुग्णालयात दोन महिन्यापूर्वी एल-थ्री वॉर्ड करोनाबाधितांसाठी असल्याचे जाहीर करण्यात आलं. त्यावेळी येथे पाच नवीन व्हेंटिलेटर्सचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त तीन व्हेंटिलेटर्सची सोयही प्रशासनाने केली. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका तपासणीमध्ये हे आठही व्हेंटिलेटर्स बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन रुग्णांना व्हेंटिलेटर्सची गरज असल्याने संजय नगरमधील रुग्णालयामध्ये जाण्यास सांगण्यात आलं. आमच्याकडे व्हेंटिलेटर्स नाही असं कारण देत संजय नगरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अस्मिता लाल आणि डॉ. सोनकर यांना या रुग्णालयातील सेवांची तपासणी करण्यासाठी पाठवले. या तपासणीदरम्यान रुग्णालयामधील ८ व्हेंटिलेटर्स काम करत नसल्याची माहिती समोर आले. रुग्णालय प्रशासनाने तांत्रिक बिघाड असल्यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स काम करत नसल्याची माहिती दिली. यासंदर्भातील माहिती देणारे एक पत्रकही राज्य सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

आणखी वाचा- नकोसा विक्रम! २४ तासांत ११ हजारांचा टप्पा प्रथमच पार, एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे

डॉ. सोनकर यांनी रुग्णालयात मी पाचव्यांदा पहाणी करण्यासाठी गेलो होतो अशी माहिती या पहाणीसंदर्भात बोलताना दिली. मात्र यावेळेस बोलताना त्यांनी व्हेंटिलेटर्स खराब असल्यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. याआधीच्या चार दौऱ्यांमध्ये मला रुग्णालयामध्ये कसलीही कमतरता दिसून आली नाही. पाचव्या दौऱ्यामधील कमतरतांसंदर्भात प्रशासनाला अहवाल पाठवणार असल्याचे सोनकर म्हणाले.