पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात पाठवतात असा गंभीर आरोप प्रसिद्ध गायक पंकज उधास यांनी केला आहे. गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द करण्यात आला होता. गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध आणि दादरी प्रकरणावरून देशातील वातारवण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर एका गुजराती दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत गायक पंकज उधास यांची थेट गुलाम अलींनाच लक्ष्य केले.

गुलाम अली गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कार्यक्रम करत आहेत पण या काळात त्यांनी एक पैसाही कर म्हणून भरलेला नाही. त्यामुळे विदेशातील कलाकार हे भारताबद्दलच्या प्रेम आणि आदर म्हणून येथे येत नाहीत. तर, केवळ कमाई करण्यासाठी येतात हे स्पष्ट होते. मग अशा कलाकारांना ‘रेड कार्पेट’ का घालायचे?, असा खोचक सवाल उधास यांनी उपस्थित केला आहे.

भारतात पाकिस्तानी कलाकारांचा सन्मान होतो. ते मुक्तपणे वावरतात, बक्कळ पैसा कमावतात पण अशाप्रकारची वागणूक भारतीय कलाकारांना पाकिस्तानात मिळत नाही. व्हिसाची विनंती देखील मान्य केली जात नाही. मला स्वत:ला तीन वेळा पाकिस्तानचा व्हिसा नाकारण्यात आला, असेही उधास पुढे म्हणाले.