हिंदू उमेदवारांनी आपल्याला प्रचारासाठी बोलाविणे बंद केले आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या २०१९च्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंदिरांना भेटी देत असतानाच आझाद यांनी वरील वक्तव्य केले आहे. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी आपण मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करीत नसल्याचे कारण स्पष्ट करणारे वक्तव्य केले होते.

युवक काँग्रेसच्या दिवसांपासून आपण अंदमान निकोबार ते लक्षद्वीपपर्यंत देशभर प्रचार करीत होते. आपल्याला प्रचाराला बोलाविणारे ९५ टक्के हिंदू होते, मात्र गेल्या चार वर्षांत ही संख्या घसरून जेमतेम २० टक्क्यांवर आली आहे, असे आझाद म्हणाले. मतांवर परिणाम होण्याची भीती असल्याने आपल्याला प्रचारासाठी बोलाविण्यास लोक घाबरत आहेत, असेही ते म्हणाले.