जेएनयूतील विद्यार्थ्यांनी दुर्गामातेबाबत काढलेल्या वादग्रस्त पत्रकाच्या वर्णनावरून शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा विरोधकांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. स्मृती इराणी यांनी यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरिअन यांनी कोणत्याही समुदायाविरोधात काहीही न बोलण्याची या सभागृहाची परंपरा असल्याचे सांगत वादग्रस्त टिप्पणी तपासण्यात येईल आणि त्यामध्ये काही आक्षेपार्ह असल्यास ते कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले.
स्मृती इराणी यांनी आपण दुर्गामातेचे भक्त असून, मी जे काही बोलले त्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचे सांगितले. हे पुरावे विद्यापीठाकडूनच मला मिळालेले असून, मला पुरावे मागण्यात आल्यामुळे मी त्याचा उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्तार अब्बास नक्की यांनी विरोधक सातत्याने माफीची मागणी करीत आहेत. त्यांना सभागृहात इतर काही कामकाज करायचे आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण तसेच जेएनयूच्या मुद्दय़ावरून गुरुवारी राज्यसभेत खडाजंगी झाली होती. दुर्गेबाबतच्या पत्रकातील उल्लेखाने स्मृती इराणींनी दिलेल्या स्पष्टीकरणावर गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाज गुरुवारी उशिरा तहकूब करावे लागले होते.