सोनियांकडून संघटनात्मक फेरबदल; पंजाबची सूत्रे कमलनाथांकडे

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व कमलनाथ यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करुन अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाबची धुरा सोपावण्यात आली आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेले आझाद यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशचे प्रभारी होते, तर कमलनाथ यांच्याकडे पंजाब व हरयाणाची जबाबदारी असेल असे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. यापूर्वी उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेले सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केंद्रीय निवडणूक समितीची धुरा असेल, तर पंजाब व हरयाणाची धुरा सांभाळणाऱ्या शकील अहमद यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश व हरयाणात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्याची दखल घेत संघटनात्मक फेरबदल केले. शनिवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हरयाणामध्ये १४ मते बाद झाल्याने काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार आर.के.आनंद पराभूत झाले होते. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी हा पराभव घडवून आणल्याचा आरोप आहे. ६७ वर्षीय आझाद हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत मानले जातात.

तर ६९ वर्षीय कमलनाथ हे काँग्रेसचे अनुभवी खासदार आहेत. छिंदवाडामधून ते नऊ वेळा विजयी झाले आहेत. कमलथान गेली १५ वर्षे पक्षाचे सरचिटणीस आहेत. मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. आसाम व केरळमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे फरबदल व्हावेत अशी मागणी सुरु होती. त्या पाश्र्वभूमीवर या नियुक्त्यांकडे पाहिले जात आहे.