लोकसभा-राज्यसभेत गदारोळ; उरी हल्ल्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न आझादांच्या अंगलट

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यावरून एकच गदारोळ उडाल्यावरून गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज होऊच शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सभागृहात येऊन उत्तर दिले पाहिजे, यावर विरोधक हटून बसले असतानाच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीचा संबंध उरीमधील हल्ल्याशी जोडल्यामुळे तर वातावरण आणखीनच चिघळले. देशविरोधी भाषा करून शहिदांचा अपमान केल्याबद्दल आझादांनी माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सत्तारूढ भाजपने घेतल्याने संघर्ष चिघळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आझाद यांचे हे वादग्रस्त वक्तव्य  कामकाजाच्या नोदींतून वगळण्याचा निर्णय अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी घेतला.

बुधवारी सुरू झालेल्या स्थगत प्रस्तावावरील उर्वरित चर्चा गुरुवारी दोन वाजल्यापासून अपेक्षित होती. पण विरोधकांनी अन्य कामकाज तहकूब करून स्थगन प्रस्तावावरील चर्चा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. पण ती अध्यक्ष हमीद अन्सारींनी नाकारली. त्यामुळे विरोधक भडकले. त्यातच मोदींनीच चच्रेला उत्तर दिले पाहिजे, असेही विरोधकांची एकमुखी मागणी होती. त्यास सरकार तयार नव्हते. आíथक प्रश्नांवर अर्थमंत्रीच उत्तर देतील, असे सरकारचे म्हणणे होते. त्यावर दोन्ही बाजूंनी तावातावाने चर्चा होत असताना कामकाज तीनदा तहकूब करावे लागले. अशा गदारोळातच विरोधी पक्षनेते आझाद म्हणाले, ‘नोटांबदीमुळे आतापर्यंत चाळीस जणांचा मृत्यू झालाय. उरीमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये यापेक्षा निम्मेसुद्धा मृत्यू झाले नव्हते. सरकारच्या चुकीच्या निर्णयाने (उरीपेक्षा) दुप्पट बळी गेले आहेत.’

आझादांच्या या विधानावर व्यंकय्या नायडू आणि संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमारांनी  आक्षेप घेतला. ‘आझादांचे विधान धक्कादायक आहे. देशविरोधी आहे, शहिदांचा अवमान करणारे आहे,’ असे अनंतकुमार म्हणाले. नायडूही त्याच अर्थाचे बोलत होते.

भाजपच्या रुद्रावताराने आझादही भडकले. संतापाच्या भरात थरथरणारे आझाद म्हणाले, ‘आता भाजपवरच लक्ष्यभेदी कारवाई केली पाहिजे. (रांगेतील) लोकांच्या हत्यांना तुम्ही जबाबदार आहात.’ यावरून पुन्हा कमालीचा गदारोळ झाला. शेवटी चारनंतर दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले. परिणामी स्थगन प्रस्तावावरील अर्धवट चर्चा शुक्रवारी केली जाईल.

लोकसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी एकसुरात प्रश्नोत्तराचा तास रद्द करून नोटबंदीवरील स्थगन प्रस्तावाची मागणी केली. मतदानाची तरतूद असलेल्या नियम ५६अन्वये चच्रेच्या मागणीवर विरोधक अडले होते, तर सरकार नियम १९३ अन्वये चच्रेस तयार होते. या नियमानुसार, मतदान नसते. त्याबाबत एकमत होत नसतानाच विरोधकांनी २१ तहकुबी सूचना दिल्या होत्या. पण त्या सभापती सुमित्रा महाजनांनी स्वीकारल्या नाहीत. दैनंदिन कामकाज झाल्यावर बघू, या त्यांच्या बाण्याने विरोधक बिथरले. मग सगळे जण सभापतींसमोरील मोकळ्या जागेत आले. त्यातच तमिळनाडूचे खासदार कावेरीचे पाणी सोडण्यासाठी आंदोलन करू लागले. सगळ्या गडबडीमध्ये दुपारी साडेबारा वाजताच कामकाज तहकूब करण्यात आले.

आता भाजपवरच लक्ष्यभेदी कारवाई केली पाहिजे. रांगेतील लोकांच्या हत्यांना तुम्ही जबाबदार आहात..   – गुलाम नबी आझाद, विरोधी पक्षनेते