घुमान येथे शुक्रवारी होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पावसाच्या सावटामुळे पुढे ढकलण्यात आला. कालपासून घुमान परिसरात ढगाळ वातावरण होते आणि त्यात आज सकाळी या ठिकाणी हलकासा पाऊसही पडला. त्यामुळे संमेलनाच्या आयोजकांनी संमेलनाचा कार्यक्रम दुपारी २ पर्यंत पुढे ढकलला आहे. उद्घाटन सोहळ्याची वेळ बदलल्याने संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळापत्रकातच बदल करणे अपरिहार्य झाले. याशिवाय, पुण्याहून साहित्य रसिकांना घेऊन निघालेली ट्रेनही अद्याप अमृतसरमध्ये पोहचलेली नाही. ही ट्रेन तब्बल तीन तास लुधियाना स्थानकावर खोळंबून होती. ट्रेन उशिराने धावत असल्याने साहित्य रसिकांना स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ मिळावा, हेदेखील सोहळ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचे मुख्य कारण आहे. संमेलनाच्या प्रथेप्रमाणे दुपारी २ वाजता ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरूवात होणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. दरम्यान, या ठिकाणी पुन्हा पाऊस आल्यास साहित्य रसिकांची गैरसोय होऊ शकते. कारण, संमेलनासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ आणि काही भाग वगळता मंडपाच्या अन्य भागावर पाण्यापासून बचाव होण्यासाठी कोणतेही आच्छादन घालण्यात आलेले नाही.