पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी आपल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाच्या पराभवाचे खापर ‘आंतरराष्ट्रीय समुदायावर’ फोडले आहे. मात्र त्याच वेळी या पक्षाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी आपल्या पराभवासाठी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि राजा परवेझ अश्रफ यांना जबाबदार धरले आहे.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीतर्फे उभ्या करण्यात आलेल्या उमेदवारांची एक बैठक पंजाब प्रांतात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसमोर बोलताना झरदारी यांनी पराभवाची समीक्षा केली.
आंतरराष्ट्रीय समुदायातील काही ‘शक्तींना’ आपला पक्ष पुन्हा सत्तेत येऊ नये असे वाटत होते, पीपीपीप्रणीत सरकारने भारतीय उपखंडात असलेल्या देशांशी केलेल्या करारांमुळे या शक्ती नाराज होत्या, असा आरोप झरदारी यांनी केला. मात्र आपला पक्ष जबाबदार विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या पराभूत उमेदवारांचे मत मात्र वेगळे असल्याचे बैठकीत दिसून आले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि राजा परवेझ अश्रफ यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचे अतोनात नुकसान केले आहे, असा आरोप उमेदवारांनी केला.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी आपले अभिनंदन केले नाही, अशी तक्रार नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांसमोर बोलताना केली होती. अखेर मंगळवारी झरदारी यांनी शरीफ यांचे सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.