मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये सत्ता ताब्यात घेतली, त्या वेळी त्यांच्या त्या कृत्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या १२ न्यायाधीशांवरही देशद्रोहाचा खटला भरविण्यात यावा, अशी खळबळजनक मागणी माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी मंगळवारी केली. मुशर्रफ यांनी नोव्हेंबर २००७मध्ये पाकिस्तानमध्ये अकारण आणीबाणी लागू केली होती. या कृत्यामुळे घटनेच्या सहाव्या कलमाचा भंग होऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बेनझीर भुत्तो यांच्या हत्येच्या कटातही सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र, २००९मध्ये त्यांनी घटनेची पायमल्ली करत सत्ता हस्तगत केली तेही चुकीचे होते, त्या वेळी १२ न्यायाधीशांच्या पीठाने त्यांच्या सत्ताग्रहणाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्या १२ न्यायाधीशांवरही देशद्रोहाचा खटला दाखल करणे आवश्यक आहे, असा दावा गिलानी यांनी केला.