काश्मीरमधील फुटीर नेता सय्यद अली शहा गिलानी (८८) शुक्रवारी पारपत्र (पासपोर्ट) अधिकाऱ्यांसमोर हजर झाला आणि त्याने आपण भारतीय असल्याचे नमूद केले. तथापि, ही बाब आपल्याला सक्तीने नमूद करावी लागत असल्याचे गिलानी याने म्हटले आहे.
गिलानी याची मुलगी सौदी अरेबियात आजारी असून तिची भेट घेण्यासाठी त्याला पासपोर्ट हवा होता. गिलानी याने पासपोर्ट अधिकाऱ्यांसमोर हजर राहून हाताच्या बोटांचे ठसे दिले आणि बुबुळांची चाचणी दिली आणि पासपोर्ट मिळण्यासाठी लागणाऱ्या अन्य बाबींची औपचारिकता पूर्ण केली.
येथील पासपोर्ट सेवा केंद्रात गिलानी नियोजित वेळी हजर राहिला आणि पासपोर्ट अर्जातील राष्ट्रीयत्व या रकान्यात त्याने आपण भारतीय असल्याचे नमूद केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जन्माने आपण भारतीय नाही, सक्तीने आपण तसे लिहिले आहे, असे गिलानी याने सांगितले.
भारतीय पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीयत्व या रकान्यात भारतीय असे नमूद करणे सक्तीचे आहे, असे समर्थन हुरियतच्या प्रवक्त्याने केले आहे. त्यामुळे गिलानी यालाही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तसे करावे लागले, असेही प्रवक्ता म्हणाला.
गिलानीच्या पासपोर्टवरून वादंग निर्माण झाला होता. गिलानी याने आपले राष्ट्रीयत्व भारतीय असल्याचे जाहीर करावे आणि देशविरोधी कारवायांबद्दल माफी मागावी, अशी भाजपची मागणी होती. तर पीडीपीने गिलानीला पासपोर्ट द्यावा, असे म्हटले होते.