भाजपाच्या विरोधकांना राष्ट्रद्रोही किंवा तत्सम नावं ठेवण्याचा प्रकार भाजपाचे नेते अजूनही करताना दिसून येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी विरोधकांची तुलना हाफिझ सईदशी नुकतीच केली होती. आता भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी विरोधकांची तुलना अमेरिकेने पाकिस्तानात घुसून कंठस्नान घातलेल्या क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनशी केली आहे.

टि्वटरच्या माध्यमातून गिरीराज सिंहांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. माओवादी, जातीपातीचं राजकारण आणि संस्थानी कारभाराचे समर्थक भाजपाप्रणीत रालोआच्या विरोधात एकवटले असून हे लोक ओसामा बिन लादेनचेही समर्थक असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.
“माओवादी, जातीवादी, सामंतवादी और ओसामावादी, सभी राष्ट्रवादी गठबंधन एनडीए के खिलाफ एकजूट हो गये है,” गिरीराज यांनी ट्विट केलंय.
त्यांनी असंही म्हटलं की विरोधक एकत्र आले तरी त्यांचा नरेंद्र मोदी सरकारवर काही परिणाम होणार नाही. विकासाच्या मुद्यावर मोदी सरकार चालत असून 2019 मध्ये आरामात बहुमत मिळवून एनडीए सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ज्या प्रकारे सगळे विरोधक भाजपाप्रणीत एनडीएच्या विरोधात एकवटत आहेत ते बघता 2019 ची निवडणूक भाजपासाठी सोपी ठरणार नाही अशी चिन्हे आहेत. भाजपालाही याची कल्पना आल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला केवळ एक लोकसभेची व एक विधानसभेची जागा जिंकता आली होती. उत्तर प्रदेशमध्ये प्रतिष्ठेच्या केलेल्या कैराना निवडणुकीमध्ये भाजपाला पराभवाची चव चाखावी लागली आणि विरोधक एकत्र आले तर काय होऊ शकतं याची चुणूकही दिसली. त्यामुळे भाजपाचे नेते अत्यंत आक्रमक झाले असून विरोधकांची तुलना हाफीज सईद व ओसामा बिन लादेन आदींशी करताना दिसत आहेत.