दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याचा ३ कोटी ८६ लाखांचा खर्च दिल्ली सरकारच्या तिजोरीतून करण्याबद्दलचे पत्र केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना दिले आहेत. स्वत:च्या खटल्यांवर दिल्लीकरांचा पैसा खर्च करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केजरीवालांवर भाजपने टिकेची झोड उठवली आहे. केजरीवालांसारखी मौज मुघलांनीदेखील केली नव्हती, अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.
बिहारमधील भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटरवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ‘काय माणूस आहे हा.. दिल्लीमध्ये दिल्लीकरांच्या पैशांवर एवढी मजा तर मुघलांनीदेखील मारली नव्हती. सर्वांनी मिळून केजरीवालांना वंदन करा,’ असे ट्विट गिरीराज यांनी केले आहे.
कमाल का आदमी है ये तो.
दिल्ली में,दिल्ली की जनता के पैसे पर इतनी मौज तो शायद मुग़लों ने भी नहीं की होगी।सब मिलके केजरीवाल को प्रणाम कीजिए https://t.co/9y4i3g0pkK
— Giriraj Singh (@girirajsinghbjp) April 3, 2017
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी दिल्ली सरकारच्या तिजोरीतून पैसे देण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजपने केजरीवालांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ‘गाडी घेणार नाही, बंगला घेणार नाही, असे सुरुवातीला म्हणत होते. मात्र आता स्वत:च्या वकिलाचा खर्च जनतेवर टाकून लूट करत आहेत. हा खटला मुख्यमंत्री किंवा सरकारवर नाही. हा खटला केजरीवालांवर आहे. त्यामुळे खटल्याची फिदेखील त्यांनीच द्यावी. जनतेच्या पैशाची लूट सहन केली जाणार नाही,’ असे म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केजरीवालांवर तोंडसुख घेतले.
भाजपसोबतच काँग्रेसनेदेखील आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ‘आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना जनतेचा पैसा आणि खासगी निधी यांच्यातील फरक समजत नसल्याचे दिसते आहे. केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांमुळे सुरु झालेल्या खटल्यासाठी जनतेचा पैसा का वापरला जातो आहे? स्वत:च्या कामासाठी जनतेचा पैसा वापरणे, हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे?,’ असा सवाल काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी विचारला आहे.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केजरीवाल यांच्यावर मानहानी प्रकरणी खटला दाखल केला आहे. या खटल्याचे ३ लाख ८६ कोटींचा कायदेशीर खर्च देण्यात यावा, यासाठी केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी अनिल बैजल कायदेशीर सल्ला घेत आहेत. केजरीवाल यांनी बैजल यांना ३ कोटी ८६ लाख रुपये सरकारी तिजोरीतून देण्यास सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 6:09 pm