अमेरिकी अध्यक्षपदाच्या या वेळच्या निवडणुकीत एकंदर चार अध्यक्षीय उमेदवारांच्या (रिपब्लिकन- डोनाल्ड ट्रम्प, डेमोक्रॅटिक- हिलरी क्लिंटन, लिबरेटरियन- गॅरी जॉन्सन आणि ग्रीन पक्षाच्या जिल स्टेन) बरोबरीनं एक पाचवा खेळाडूदेखील रिंगणात आहे. हा उमेदवार म्हणजे प्रसारमाध्यमं.

या निवडणुकांमधला माध्यमांचा रस अभूतपूर्व म्हणावा लागेल. खरं तर कोणतीही निवडणूक म्हटली की माध्यमांना सुगीचे दिवस असतात. सर्वार्थानं. पण तरी या निवडणुकीनं आतापर्यंतच्या माध्यमसुगीला मागे टाकलं आहे. त्या मागचं कारण ही निवडणूक ऐतिहासिक आहे, हे तर आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या वेळी धनाढय़ बिल्डर, रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार.. म्हणजे आपल्या बिगबॉसमधल्या कलाकारांसारखा.. वाटेल ते बोलायला तयार असलेला डोनाल्ड ट्रम्पसारखा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे एका अर्थानं माध्यमांना चेवच आला आहे.

एका अर्थानं माध्यमं या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका ठरवतायत. ती ठरवताना माध्यमांनी आपल्या तटस्थतेला अधिकृतपणे तिलांजली दिलेली आहे. तशी ती द्यावी की नाही याबद्दल मतभेद असू शकतात. पण तरी यातला चांगला भाग असा की माध्यमांनी जी काही भूमिका घ्यायची ती अधिकृतपणे घेतलेली आहे आणि तिला त्यांनी आवश्यक तो तात्त्विक आधार दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडच्या ‘अशोकपर्वा’सारखा पेडन्यूजचा प्रकार नाही. आम्ही अमुकच्या विरोधात/बाजूनं आहोत, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. आतापर्यंत माध्यमांनी हाताच्या बाह्य़ा सरसावून अशी इतकी उडी कधी निवडणुकीच्या रिंगणात घेतली नव्हती. या संदर्भात काही काही घटना तर पहिल्यांदाच घडतायत.

उदाहरणार्थ ‘यूएसए टुडे’ या वर्तमानपत्रानं आपण काय करणार आहोत, हे जाहीर करणं. ३४ वर्षांच्या इतिहासात या वर्तमानपत्रानं निवडणुकांत कधी एखाद्या उमेदवाराची तळी उचलली नव्हती. ते या वेळी घडलं. या वर्तमानपत्रानं जाहीर केलंय, आम्ही ट्रम्प यांच्या विरोधात आहोत. ही व्यक्ती अमेरिकेच्या सर्वोच्चपदी बसण्यायोग्य नाही, असं या वर्तमानपत्रानं आपल्या विशेष संपादकीयात म्हटलंय. आतापर्यंत आम्हाला कधी असं पाऊल उचलावं असं वाटलं नव्हतं. पण या वेळी आमची तटस्थता सोडून द्यायची वेळ आलीये, असं आपल्या खास संपादकीयात म्हणून या वर्तमानपत्रानं आपला ट्रम्प विरोध जाहीर केला. पण महत्त्वाची बाब अशी की म्हणून हे वर्तमानपत्रं हिलरी क्लिंटन वा अन्य कोणाच्या बाजूने उभं आहे असं नाही. आमचा ट्रम्प यांना विरोध आहे याचा अर्थ आम्ही क्लिंटन यांची तळी उचलतोय असं नाही, आमचा त्यांनाही पाठिंबा नाही, असं हे वर्तमानपत्रं म्हणतं.

असं करणारं ते एकटं नाही. अमेरिकेतल्या महत्त्वाच्या अशा १६ वर्तमानपत्रांनी ट्रम्प यांच्या विरोधी भूमिका जाहीर केलीये. ही व्यक्ती अध्यक्षपदी बसण्याच्या लायकीची नाही, असं या सर्वच्या सर्व वर्तमानपत्रांचं म्हणणं आहे. या सगळ्यांनी आपापली कारणं दिली आहेत. त्यातला समान भाग म्हणजे ट्रम्प यांची असहिष्णुता, भावनेच्या भरात काहीही बोलणं, प्रत्येक गोष्ट ‘मी’ या एकाच बिंदूभोवती केंद्रित ठेवणं, अल्पसंख्य, भिन्नधर्मीय, स्थलांतरित, महिला आदींविषयी अत्यंत अनुदार भूमिका घेणं.. हे यातले काही समान मुद्दे.

ते अर्थातच ट्रम्प यांना मान्य नाहीत. ही वर्तमानपत्रं ही बडय़ा उद्योगांची तळी उचलणारी आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार माध्यमांनी त्यांच्यावर अन्याय केलाय, पुरेशी प्रसिद्धी दिलेली नाही. पण हा दावा प्रत्यक्षात टिकणारा नाही.

कारण माध्यमांवरचा अ‍ॅण्ड्रय़ू टिंडाल अहवाल. या अहवालात माध्यमांच्या एकंदर कामगिरीचं विश्लेषण केलं जातं. १ जानेवारी ते ५ सप्टेंबर या कालावधीत या अहवालानं अध्यक्षीय उमेदवारांबाबत माध्यमांची पाहणी केली. तीनुसार अमेरिकेतल्या आठ प्रमुख वाहिन्यांनी.. यात सीएनएन, सीएनबीसी, वगरे आल्या.. ट्रम्प यांच्यावर एकंदर ८२० मिनिटं खर्च केली. त्या तुलनेत हिलरी क्लिंटन यांना याच काळात मिळालेला माध्यमावधी ३८६ मिनिटं इतका होता. या ३८६ मिनिटांतली ९० मिनिटं क्लिंटन यांच्यावर ईमेल संदर्भात जे आरोप झाले, त्यावर खुलासा करण्यातच गेली.

हा आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीचा विक्रम आहे. ट्रम्प यांना इतका वेळ मिळाला कारण एक तर त्यांची वाद ओढवून घेण्याची हातोटी आणि त्या आधी माध्यमांना स्वत:हून फोन करून काही ना काही, कशावर ना कशावर मुलाखत द्यायची त्यांची हौस. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ट्रम्प जवळपास प्रत्येक रविवारी सकाळी सर्व वाहिन्यांना फोन करून मुलाखत घेण्याची व्यवस्था करत. हा प्रकार इतका वाढला की शेवटी माध्यमांनी आपल्या भावी अध्यक्षाच्या गळापडू मुलाखती घ्यायला नकार दिला. टिंडाल अहवालानुसार या अशा स्वघोषित मुलाखतीतनं ट्रम्प यांनी नऊ महिन्यांत ३० वादंग ओढवून घेतले. एका बाजूला ट्रम्प यांचा हा माध्यमातिरेक. आणि दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांचा अगदी पत्रकार परिषदांनाही नकार. या दोन टोकांत अमेरिकेची माध्यमं अडकलेली होती. अध्यक्षीय उमेदवारीची तयारी करण्याआधी ट्रम्प यांचे बटबटीत अशा टॅब्लाईड्शी उत्तम संबंध होते. अशा वर्तमानपत्रांना चमचमीत काही तरी लागतं. ट्रम्प ते भरपूर देत. ही सवय तेव्हा एकवेळ खपून गेली. पण अध्यक्षीय उमेदवार एकदा झाल्यानंतर ट्रम्प यांना हा मोह आवरला नाही. ते त्याच पद्धतीच्या प्रसिद्धीच्या मागे राहिले. अशा मंडळींचा एक सिद्धांत असतो. प्रसिद्धी ती प्रसिद्धीच.. त्यात चांगलं वाईट काही नसतं.

पुढे ही सवय त्यांच्या भलतीच अंगाशी आली. त्यात गेल्या आठवडय़ातल्या अध्यक्षीय वादफेरीत पत्रकारांनी दोन्ही उमेदवारांच्या दाव्यांची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ट्रम्प अडचणीत आले. कारण त्यांच्या दाव्यांत बऱ्याच उणिवा, तफावती आढळल्या. हे उघड झाल्यावर ट्रम्प यांची प्रचारप्रमुख केलीन कॉलवे म्हणाली.. अध्यक्षीय उमेदवार जे काही बोलतोय त्याचं खरंखोटं तपासायची जबाबदारी पत्रकारांची नाही. त्यांनी फक्त बातमीदारी करावी.

हे भयानकच. याचा अर्थ आमचा नेता जे काही सांगतोय ते तसंच्या तसं छापा वा प्रसारित करा. त्यातला तपशील तपासू नका. ट्रम्प हे असं म्हणाले आणि माध्यमांतनं त्यांच्या कर्मकहाण्या उघड व्हायला सुरुवात झाली. न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांच्या करबुडवेगिरीचं आणखी एक प्रकरण समोर आणलं. ९५ साली त्यांनी स्वत:च्या कंपनीला तब्बल ९८ कोटी ६० लाख डॉलर्सचा तोटा झाल्याचं कर खात्याला कळवलं. त्यामुळे पुढची जवळपास १८ र्वष त्यांना आयकर भरावा लागला नाही, अशी ती बातमी. कारण तोटाच झालेला असेल तर कर भरायचा कशावर? उत्पन्नच नाही. म्हणून करमाफी. पण या काळात ट्रम्प बाकीचे सर्व कर भरत होते, कर्मचाऱ्यांना वेतन देत होते आणि आपले उद्योगही सुरूच ठेवत होते. याचा सगळा तपशील न्यूयॉर्क टाइम्सच्या आजच्या बातमीत आहे. त्याने ट्रम्प पिसाळलेच. करकायदा माझ्या इतका कोणाला कळत नाही.. त्यातल्या त्रुटी मी जाणतो.. म्हणूनच मी त्या बुजवण्यासाठी जास्त लायक आहे, असं त्यांनी सांगितलं. हे असं म्हणणं म्हणजे हर्षद मेहता यानं भांडवली बाजार.. बँकांच्या व्यवहारातल्या त्रुटी मला माहिती आहेत.. सबब मीच चांगला अर्थमंत्री होऊ शकतो.. असं म्हणण्यासारखं. त्यांच्या या वक्तव्यावर देखील माध्यमांतून प्रतिहल्ला झाला. ट्रम्प यांचा तोल इतका घसरला की त्यांनी गेल्या आठवडय़ात अध्यक्षीय वादफेरीचा सूत्रधार पत्रकार लेस्टर होल्ट याच्यावर डेमोक्रॅटिक पक्षास लागू असल्याचा आरोप केला. आता ट्रम्प त्यांच्या अवस्थेसाठी माध्यमांनांच दोष द्यायला लागलेत.

ओळखीचं वाटत असेल नाही हे सगळं!

अनुकूल प्रसिद्धी मिळत असते तोपर्यंत माध्यमं या मंडळींना हवीहवीशी वाटत असतात. पण याच माध्यमांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की मग ती ‘विरोधकांकडून पसे घेऊन’ बातम्या देतात असा कांगावा अशा नेत्यांच्या भक्तगणांकडून सुरू होतो (या अंधभक्तांना हेही कळत नाही की पसेच घेऊन लिहिलं जात असेल तर ते द्यायची अधिक क्षमता विरोधकांत असेल की सत्ताधाऱ्यांत? असो.). ट्रम्प यांच्या भक्तांनीही असाच सूर लावलाय. अर्थात अशांना उत्तर द्यायचं नसतं, हे अमेरिकी माध्यमांना चांगलंच कळतं. त्यामुळे माध्यमं स्वत:च्या चारित्र्यप्रमाणपत्रासाठी प्रयत्न करू लागलीयेत असं अजिबात नाही. ती आपल्या पेशाला जागून बातम्या देतायत. अधिक जोमानं देतायत. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीत ही पत्रकारमंडळीही न कळत एक अदृश्य उमेदवार बनून गेलीयेत. तो, ती आणि ते.. अशी ही लढाई आहे.

 

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter @girishkuber