झटकन नेते होऊ पाहणारे सोपा मार्ग निवडतात तो म्हणजे वाह्यत, अतिरंजित वक्तव्यं करायची. अशी वक्तव्यं करायची म्हणजे मग प्रस्थापितांना शिव्या घालायच्या. स्वत:च्या अधोगतीसाठी, किंवा प्रगतीच्या कूर्मगतीसाठी दुसऱ्यांना बोल लावण्याइतका अन्य सोपा मार्ग नाही. ट्रम्प यांच्यासारखी माणसं हा सोपा मार्ग निवडतात.

जी गोष्ट सामान्य बुद्धीच्या व्यक्तीलाही कळू शकते ती जगातल्या एकमेव महासत्तेच्या प्रमुखपदाचं स्वप्न पाहणाऱ्याला कळत नाही, असं कसं असेल? त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जे काही बोलतायत, वाह्यत विधानं करतायत त्यामागच्या विधानाचं कारण शोधायला हवं. ते शोधू गेलं तर जगात सध्या ठिकठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचंच कसं पेव फुटलंय, ते कळू शकेल. मग तो फिलिपिन्सचा, ‘‘मला हिटलर म्हणा,’’ म्हणणारा अध्यक्ष रॉड्रिगो डय़ुटेर्टे असेल, कॅनडाचा शीर्षांसन करणारा, बॉक्सर असा, विरोधी खासदाराला ढोपर मारणारा तरणाबांड पंतप्रधान जस्टिन त्रुदॉ असेल, ब्रेग्झिटच्या निमित्तानं ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची अतिरेकी भीती घालणारा निगेल फराजसारखा नेता असेल किंवा जर्मनीत पुन्हा नाझीवादाचे पुनरुत्थान करू पाहणारे असतील. जगात सध्या सगळीकडेच अतिरेकी विचारांना मागणी आहे. अतिरेकी विचारांना विरोध करणारेही आपली मांडणी तितक्याच अतिरेकी पद्धतीनेच करतात, हे याचं आणखी एक वैशिष्टय़.

पण यासाठी या मंडळींनाच फक्त विरोध करून चालणार नाही. ही मंडळी असे अतिरेकी विचार मांडू लागलीयेत कारण त्यांच्या तशा विचारांना पाठिंबा आणि पाठबळ देणारा समाज वाढू लागलाय, म्हणून. देश, प्रदेश, समाज कोणताही असो. या अशा अतिरेकींना सध्या बरे दिवस आलेत. त्याचमुळे महासत्तेच्या प्रमुखपदाचं स्वप्न पाहणारा, अमेरिकेनं सर्वच व्यापारी करार मोडून फेकायला हवेत, असं सहज म्हणतो आणि तसंच करायला हवं, असं लोकांनाही वाटतं. या संदर्भातला एक योगायोग राजकीय परिस्थितीची विषण्णता दाखवणारा आहे.

गेल्या वर्षी ग्रीस जेव्हा आर्थिक संकटात होता, म्हणजे अजूनही आहे त्या वेळी ग्रीसच्या युरोपीय समुदायातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो अजूनही आहे. कमालीच्या कठीण परिस्थितीमुळे ग्रीसला आपली देणी देता येत नव्हती. त्या वेळी ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सी सिप्रास यांनी सरळ भूमिका घेतली, आपण ही कर्ज बुडवू या, अशी. त्याही वेळी त्यांना अगदी ग्रीक जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला. आंतरराष्ट्रीय करार, दिलेला शब्द पाळायला हवा.. वगैरे शहाणपणा तिकडे कोणीही काढला नाही. एका बाजूला हा खरोखर कफल्लक झालेला ग्रीस. आणि दुसरीकडे एकमेव महासत्ता असलेला जगातला सर्वात समर्थ देश अमेरिका. दोन्ही देशांच्या नेत्यांची भाषा एक. अतिरेकीवाद अधोरेखित करणारी.

तेव्हा जनमताचं या अतिरेकीवादाला असलेलं समर्थन लक्षात घेतलं तर हे नेते असं आणि इतकं टोकाचं का बोलतात, ते कळू शकेल. महिला प्रतिस्पर्धीच्या पतीविषयी टिप्पणी करणं, देशातले धनाढय़ कसे कर भरत नाहीत याचं अतिरंजित वर्णन करणं, विद्यमान सत्ताधीश कसे लबाडय़ा करतात आणि आपणच कसे सगळ्यांचे तारणहार होऊ शकतो, असं सांगणं हे सगळं यातून येतं. ट्रम्प यांच्या वक्तव्यांमागे हे सामाजिक कारण आहे, हे आपण समजून घ्यायला हवं.

त्यामुळे ट्रम्प जेव्हा बिल क्लिंटन यांचा अकारण अपमान करत होते, हिलरी क्लिंटन बोलत असताना त्यांच्या मागे गुरकावल्यासारखे चालत होते किंवा वॉरन बफेसारख्या धनाढय़ानं कशी करचुकवेगिरी केली ते सांगत होते त्यामागचं हे वास्तव आहे. अमेरिकेतल्या नव्या अर्थकांक्षी, स्वप्निल समाजातील एका गटाला या सगळ्यांचं आकर्षण आहे. हा वर्ग परिस्थितीनं नाडलेला आहे. आणि आपल्याला प्रगतीची संधी न मिळण्यामागे प्रस्थापित आहेत असंच त्याचं मत आहे. अशा वर्गाला वास्तविक अधिक प्रामाणिक मार्गदर्शन व्हायला हवं. या प्रामाणिक मार्गदर्शनातून कष्टाचं, नियम पालनाचं महत्त्व समजावून सांगितलं जायला हवं. आता जे मोठे झालेत ते कसे स्वकष्टानं आणि व्यवस्थेची चौकट पाळतच तिथपर्यंत आलेत. असं या वर्गाला सांगायला हवं.

पण झटकन नेते होऊ पाहणारे सोपा मार्ग निवडतात. तो म्हणजे वाह्यत, अतिरंजित वक्तव्यं करायची. अशी वक्तव्यं करायची म्हणजे मग प्रस्थापितांना शिव्या घालायच्या. स्वत:च्या अधोगतीसाठी, किंवा प्रगतीच्या कूर्मगतीसाठी दुसऱ्यांना बोल लावण्याइतका अन्य सोपा मार्ग नाही. ट्रम्प यांच्यासारखी माणसं हा सोपा मार्ग निवडतात.

अशांमुळे राजकारणाची लय बिघडते. तसं पाहायला गेलं तर लय बिघडल्याखेरीज प्रगती होत नाही, हेही खरं. कारण एकदा का एका लयीची सवय लागली की तिचा म्हणून एक स्थितीवाद तयार होतो. एकदा का असा स्थितीवाद तयार झाला की माणसं आहे तिथेच रमतात. म्हणजेच प्रगती खुंटते. तेव्हा गती बदलली जायला हवी यात शंकाच नाही.

पण स्थितीवादाचा प्रत्येक बदल हा सर्जक असतोच असं नाही. पारंपरिक ग्रंथवाचनात, संग्रहात अ‍ॅमेझॉन या कल्पनेनं केलेला बदल हा सर्जक बदल. म्हणजे Creative Disruption. मोबाइल फोननं बँकिंग सेवेत जो काही बदल केलाय तो सर्जक बदल. दळणवळण क्षेत्रात जे काही होतंय तो सर्जक बदल. परंतु ट्रम्प यांच्यासारखे आणतात तो केवळ संहार. त्यात सर्जनशीलता काही नसते. पण हे या अशांना कळत नाही. त्यामुळे आपल्यावर होणारी प्रत्येक टीका म्हणजे आपल्याला सर्जकशीलतेमुळे होणारा विरोध आहे असं हे देशोदेशीचे ट्रम्प मानत असतात. हे किती सर्रास होतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आवरू पाहणाऱ्यांकडे ट्रम्प का दुर्लक्ष करतात ते कळेल. रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते ट्रम्प यांना त्यांच्या भाषेबाबत, वागण्याबाबत सावधगिरीचा इशारा देत होते. पण ट्रम्प यांनी त्यांची दखलही घेतली नाही.

तेव्हा अखेर भान बाळगायचं ते जनतेनं. व्यवस्थेविरोधात उभा राहणारा प्रत्येक जण आकर्षक वाटत असला तरी अशा प्रत्येकाच्या कृतीत सर्जकता असतेच असं नाही. म्हणून नागरिकांनी या वेडय़ांमागचं हिशेबी शहाणपण ओळखायला हवं. अमेरिकी नागरिकांतल्या काही सुजाणांना आता याची जाणीव व्हायला लागलीये. जनमत चाचण्यांत डोनाल्ड ट्रम्प मागे पडू लागलेत ते याचमुळे. आपण यातनं काही शिकायला हवं. आणि हे शिकण्यासाठी निवडणुकांची वाट पाहायलाच हवी असं नाही.

ते (बिल क्लिंटन) आणि मी..

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि हिलरी यांचे पती बिल क्लिंटन यांचे महिलांशी र्वतन एखाद्या श्वापदाप्रमाणे होते, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी झालेल्या दुसऱ्या चर्चासत्रात ते बोलत होते. मी केवळ महिलांबद्दल बोललो. बिल यांनी तर सर्वोच्च सत्ताकेंद्री बसून प्रत्यक्ष कृती केली, असे ते म्हणाले. हिलरी यांना पाठिंबा दिल्याबद्दल ट्रम्प यांनी माध्यमांवरही टीका केली.

ते (डोनाल्ड ट्रम्प) आणि मी..

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी उमेदवारांत झालेल्या दुसऱ्या चर्चासत्रात रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प हे पातळी सोडून बोलले, तर मी अधिक उंची गाठली असे भाष्य डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी सोमवारी केले. वास्तविक ट्रम्प यांनी त्यांच्या गलिच्छ विधानांबद्दल माफी मागणे अपेक्षित असताना ते पुन:पुन्हा खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत राहिले. सर्व जगाला माहीत आहे की ते महिलांना कसे वागवत आहेत. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांचे हे वागणे अमेरिकी नागरिक पाहत आहेत. त्यांची मुस्लिमांसंबंधी भूमिका आपण पाहिली. मात्र आपल्यापुढे खरा प्रश्न हा आहे की आपल्यासाठी नेमका कोणता उमेदवार योग्य आहे. सर्वाचे हित साधणारा, सर्वाना एकत्र घेऊन जाणारा नेता आपल्याला हवा आहे. तरच पुढील पिढय़ांचे कल्याण होणार आहे, असे हिलरी म्हणाल्या.