प्रमोद महाजन खासगी गप्पांत एक गोष्ट नेहमी सांगायचे. ती म्हणजे मी माझ्या सहकाऱ्यांना कसं सांगतो, माध्यमांच्या वाटय़ाला जाऊ नका.. त्यांच्याबरोबर भांडत बसलो तर नुकसान आपलं होतं आणि नाव त्यांचं. त्यामुळे या उद्योगात पडायचं नाही. माध्यमांशी भांडण्यात वेळ घालवायचा नाही..

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना आता प्रमोद महाजन आणि त्यांचा हा सल्लाि माहीत असायची काही शक्यता नाही. तो माहीत असता तर ट्रम्प यांचं नक्कीच भलं झालं असतं. माध्यमांशी लढून गुडघे फोडून घेण्यात त्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा खर्च केली नसती. हे न कळणं हा माध्यमांचा लागलेला शाप आहे. ट्रम्प यांना तो सहन करावा लागतोय.

वास्तविक सुरुवातीला ही लढत नेहमीच्या निवडणुकांसारखीच होती. हा उमेदवार विरुद्ध तो. फरक इतकाच की या वेळी हा विरुद्ध ही उमेदवार आहेत. तर या हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात गरळ ओकताना रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी यात माध्यमांना ओढलं. माध्यमं ही त्यांना धार्जिणी आहेत कारण क्लिंटन यांना पाठिंबा देणाऱ्या धनाढय़ उद्योगपतींनी माध्यमांतही पैसा ओतलाय, असा धाडसी आरोप ट्रम्प यांनी केला. इथपर्यंत एक वेळ सगळं ठीक होतं. फक्त असा आरोप करताना ट्रम्प यांनी सरसकट सर्वच माध्यमांना एका काळ्या रंगात रंगवण्याऐवजी त्यांना अभिप्रेत असलेल्या वर्तमानपत्रावर थेट आरोप करायला हवा होता. त्यामुळे उडदामाजी असलेले काळे आणि गोरे कोण ते समजलं असतं. ते न झाल्यामुळे सगळीच माध्यमं, वर्तमानपत्रं एकाच मापात मोजली गेली. त्यामुळे माध्यमवाले त्यांच्यावर रागावले आणि माध्यमांच्या रागावण्याला हातपाय नसतात. फक्त लेखणी असते. माध्यमांनी मग तीच चालवायला सुरुवात केली.

मिशेल फील्डस नावाच्या वार्ताहरानं ट्रम्प यांच्याविरोधात पहिली तोफ डागली. तिनं ट्रम्प यांच्या प्रचारप्रमुखाला लक्ष्य केलं. कोरे लेव्ॉन्डोवस्की हा ट्रम्प यांचा प्रचारप्रमुख, तर मिशेल वृत्तसेवेची प्रतिनिधी. एका प्रचारसभेनंतर तिनं ट्रम्प यांना काही प्रश्न विचारले. ते जसजसे अवघड होत गेले तसतसे ट्रम्प अस्वस्थ होत गेले. आणि शेवटी तर लेवॅन्डोवस्की यांनी मिशेलचा दंड धरून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मिशेल लेचीपेची नव्हती. तिनं त्यांच्याविरोधात खटला भरला. चौकशी सुरू झाली तेव्हा त्यात निष्पन्न झालं की लेवॅन्डोवस्की हा मिशेलशी असभ्य वागलाय. त्याला दंड झाला. पण खटला मिटला नाही. तो मिशेलनं लावून धरला. अखेर लेवॅन्डोवस्कीला तुरुंगात धाडल्यावरच मिशेल शांत झाली. यथावकाश ट्रम्प यांनीही लेवांडोवस्की याला दूर केलं. माध्यमांनी लिहिलं: लेवॅन्डोवस्कीची हकालपट्टी.

त्यावर माध्यमांनी ही बातमी चुकीची दिली, आम्ही दोघे आनंदाने विभक्त झालो, असं ट्रम्प यांनी सांगायचा प्रयत्न केला. त्यावर लेवॅन्डोवस्की यांच्या अशाच उद्योगांचं प्रकरण माध्यमांनी बाहेर काढलं. अखेर ट्रम्प यांची चांगलीच शोभा झाली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रांच्या अशा उद्योगांना सुरुवातच झाली. त्यात एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी एका वार्ताहराची नक्कल केली. वार्ताहराचं काही नुकसान झालं नाही. पण आपला आगामी अध्यक्ष किती लहान, कोता आहे, ते सांगायला माध्यमांनी सुरुवात केली. ट्रम्प पुन्हा रागावले.

नंतर ट्रम्प यांच्या प्रत्येक वक्तव्यावर वाद व्हायला लागले. ते काही माध्यमांनी केले होते, असं अजिबात नाही. पण तरी ट्रम्प यांनी त्यासाठी माध्यमांना जबाबदार धरायला सुरुवात केली. तणाव आणखी वाढला. त्यात मग एका साप्ताहिकानं ट्रम्प यांच्या विद्यमान पत्नीची त्या देहदर्शन-उद्योगात असतानाची छायाचित्रं प्रकाशित केली. वास्तविक त्याची गरज नव्हती. कारण सौभाग्यवती ट्रम्प या पूर्वी चरितार्थासाठी देहप्रदर्शन करीत, हे जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तरीही ती छायाचित्रं छापली गेल्यानं लोकांना चघळायला एक भलताच विषय मिळाला.

मग एकापाठोपाठ एक असे ट्रम्प यांचे मुद्दे बाहेर पडू लागले. वास्तविक अशा वेळी ट्रम्प यांनी माध्यमांशी दोस्तीचा हात पुढे करण्याऐवजी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवण्याचा पर्याय निवडला. त्यांनी ट्वीट केलं : भ्रष्ट आणि किळसवाण्या वार्ताहरांनी जरा तरी प्रामाणिक वृत्तांत लिहिले तर मी हिलरी यांना सहज हरवू शकतो. वास्तविक याची काही गरज नव्हती. पण हे उमगून शहाणपणाने वागले/बोलले तर ट्रम्प कसले? पुढच्या कालखंडात मग एकापाठोपाठ असे ट्रम्प यांचे उद्योग माध्यमांनी चव्हाटय़ावर आणायला सुरुवात केली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं त्यांची करचोरी बाहेर काढली तर ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं ट्रम्प यांच्या लैंगिक स्वैराचाराच्या कथित कहाण्या प्रसृत करायला सुरुवात केली.

ट्रम्प आणखीच रागावले. माध्यमांवर मधेमधे आगपाखड करत राहिले. यापाठोपाठ मग एकेका वर्तमानपत्रानं जाहीर करायला सुरुवात केली, ट्रम्प हे अध्यक्षपदासाठी कसे अयोग्य आहेत ते. ही लाट इतकी तीव्र होती की ‘यूएसए टुडे’सारख्या मध्यममार्गी वर्तमानपत्रालाही ट्रम्प नकोसे झाले. आपल्या ३४ वर्षांच्या इतिहासात या वर्तमानपत्रानं निवडणुकीत कोणाविरोधात पहिल्यांदा अधिकृत भूमिका घेतली. लहानमोठय़ा अशा तब्बल १४ वर्तमानपत्रांनी ट्रम्प यांना अधिकृतपणे विरोध केलाय. तेव्हा या निवडणुकीत ट्रम्प हरलेच तर तो एका अर्थी त्यांना लागलेला माध्यमांचा शाप मानायला हवा.

..किती शहाणपणाचा होता प्रमोद महाजनांचा सल्ला. ट्रम्प यांना तो मिळू शकला नाही. पण महाजन यांच्या पक्षबांधवांनी तो लक्षात घ्यायला हरकत नसावी.