04 March 2021

News Flash

यूएस ओपन :  मायदेशाची भीती आणि भारतीय टक्का

बराक ओबामा यांच्या मते हिलरी क्लिंटन या न्यूयॉर्कच्या नव्हे तर पंजाबच्या सिनेटर आहेत.

अमेरिकेत हिंडताना भारतीयांना टाळायचं म्हटलं तरी ते टाळता येत नाही, अशी परिस्थिती आहे. काही काही भागांत तर संध्याकाळी भारतीय आजी-आजोबांचे जथेच्या जथे शाली वगैरे पांघरून वेळ घालवताना दिसतात. खरं तर भारतातल्या विमानतळांपासूनच अमेरिकेकडे निघालेल्या भारतीयांची चेहरेपट्टी ओळखू यायला सुरुवात होते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातली पोरं बिग अ‍ॅपलच्या देशात जायला मिळतंय या धन्य धन्य भावनेनं भारलेली असतात, तर प्रौढ मंडळी सुनेच्या किंवा लेकीच्या संभाव्य बाळंतपणासाठी न्यायच्या सामानाने वाकलेली असतात. अमेरिकेच्या भूमीवर आपलं वंशसातत्य राखणाऱ्या पोराचा अभिमान (ही बाळंतपणाची अमेरिकावारी पहिलीच असेल तरच हा अभिमान. नंतरच्या प्रत्येक प्रसूतीसाठी मात्र शुद्ध वैताग) त्यांच्या चेहऱ्यावरनं ओसंडत असतो आणि अशांच्या सामानातनं बाळंतविडा (तोही बाळंतपण फेरी पहिलीच असेल तर) डोकावत असतो.

एके काळी ही अशी भारतीय ठेच लंडनमध्ये पावलापावलावर लागायची. आता ती न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया, सिएटल, बोस्टन वगैरे अनेक शहरांत लागते. सिएटल नगरपालिकेच्या खानावळीत तर भारतीय खाद्यपदार्थ सुरू केले जावेत अशी मागणी केली गेलीये. असो. मुद्दा इतकाच. अमेरिकेत आता भारतीय हे अप्रूप राहिलेले नाहीत आणि भारतीयांना अमेरिकेची नवलाई राहिलेली नाही.

भारतीय माणसाला मुदलातच राजकारणाचं आकर्षण. त्या अर्थाने आपल्या देशात सव्वाशे कोटी जण राजकीय विश्लेषक आहेत, असं मानायला काही हरकत नाही. शरद पवारांपासून ते डोनाल्ड ट्रम्प व्हाया हिलरी क्लिंटन अशा सर्वाचं राजकारणात काय चुकलं ते भारतीयांना जितकं कळतं तितकं फारच कमी जणांना कळत असेल. तेव्हा राजकारणाच्या आखाडय़ातही रिंगणापलीकडे का असेना अमेरिकेत भारतीय मोठय़ा प्रमाणावर आढळतात. त्याची दखल राजकीय पक्षांनी देखील यथोचित घेतलेली आहे.

उदाहरणार्थ हिलरी क्लिंटन. त्या जेव्हा न्यूयॉर्कमध्ये प्रायमरीसाठी आल्या, तेव्हा त्यांच्यापेक्षा त्यांचा वेश अनेकांचं लक्ष वेधून घेत होता. खाकी रंगाची पाटलोण आणि त्यावर निळा/ किरमिजी/ हिरवा/ पांढरा असा कुडता. किंवा अलीकडच्या भाषेत कुडती. त्याही वेळी हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांपेक्षा त्यांच्या वेशभूषेची चर्चा जास्त झाली होती. ती करणाऱ्या सर्वाचं एका मुद्दय़ावर एकमत होतं.

त्या वेशभूषेच्या भारतीय संबंधांबाबत. त्या वेळी नंतर हे भारतीय संबंध शोधण्याची अहमहमिका माध्यमांत लागली. तेव्हा कळलं ही कुडती थेट पंजाबातल्या लुधियानातनं आली होती. या गावच्या जुही किलाचंद यांचं छानसं निवडक वस्त्रप्रावरणांचं दुकान आहे न्यूयॉर्कमध्ये. हिलरीबाईंनी तिथून तो वेश घेतला होता. लुधियानातलं शिंगोरा शॉल्स कापड फॅशनच्या दुनियेत विशेष विख्यात आहे म्हणतात. त्या कापडातनं बनवलेली खास रंगीबेरंगी कुडती होती ती. हिलरीबाईंनी अशा रंगीबेरंगी वेशभूषेसाठी पंजाबची निवड केली यात काहीही आश्चर्य नाही.

कारण बराक ओबामा यांच्या मते हिलरी क्लिंटन या न्यूयॉर्कच्या नव्हे तर पंजाबच्या सिनेटर आहेत. ओबामा तसं जाहीरपणे म्हणाले होते. कारण हिलरी यांच्या जवळपास इतके सारे भारतीय होते. त्यातले चटवाल कुटुंबीय तर भारतातदेखील गाजले. हे अमेरिकेतले बडे हॉटेलवाले. हिलरी आणि बिल यांचे खास जवळचे. त्यामुळेही असेल पण त्या कारणाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचेही ते जवळचे बनले. चटवाल हेही पंजाबी. शीख. मग त्यांना सिंग यांच्या काळात पद्मपुरस्कार वगैरे मिळाला. आणि नंतर ते अमेरिकेत तुरुंगातच गेले. त्यांच्या नावावर अनेक आर्थिक गुन्हे नोंदले गेले. अर्थात हा एखादा अपवाद. पण बाकीचे मात्र तसे वादग्रस्त नक्कीच नाहीत.

उदाहरणार्थ डॉ. सुशील जैन. हे बिल क्लिंटन यांचे नेत्र शल्यचिकित्सक. म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर. भारतानं १९९८ साली अणुचाचण्या केल्याची बातमी आली तेव्हा डॉ. सुशील यांच्यासमोर अध्यक्ष बिल यांचाच डोळा होता. म्हणजे क्लिंटन हे डॉ. जैन यांच्याकडून डोळे तपासून घेत होते.

नीरा टंडन हेदेखील अलीकडचं बडं भारतीय नाव. ओबामा प्रशासनात मोठय़ा हुद्दय़ावर त्या आहेतच. पण त्याहूनही अमेरिकेत त्या ओळखल्या जातात हिलरी यांच्या निकटवर्तीय म्हणून. ही त्यांची ओळख इतकी भक्कम आहे की समजा उद्या हिलरी अध्यक्ष झाल्याच तर या टंडनबाईंकडे मोठी जबाबदारी येणार हे नक्की. झालंच तर राजा कृष्णमूर्ती हेदेखील असंच प्रशासनातलं मोठं नावं. ओबामा प्रशासनात तर इतके भारतीय होते की एक नाही, दोन नाही तर तब्बल ३६ वरिष्ठ पदांवर भारतीय व्यक्ती होत्या.

अमेरिकेत भारतीय हे आफ्रिकींसारखे सांगकामे म्हणून ओळखले जात नाहीत, ही एक महत्त्वाची बाब. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय याच गटांत भारतीय मोडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे गडगंज भारतीयांची संख्याही तिकडे प्रचंड आहे. वैद्यकीय, उद्योगजगत, व्यावसायिक.. असं एकही क्षेत्र नाही की त्यात यशस्वी भारतीय नाहीत. आता यात गर्व से कहो हम भारतीय है.. असं मानायचा बालिशपणा करायचं काहीही कारण नाही. कारण मुदलात अमेरिकेत जाणारा भारतीय हा शिक्षित, उच्चशिक्षित असतो. परिश्रम करायची इच्छा असतेच. आणि त्या परिश्रमांना यशाची फळं लागतील याची हमी देणारी अमेरिकेतली व्यवस्था असते. त्यामुळे आपली माणसं अमेरिकेत बघता बघता मोठी होतात. आफ्रिकी, मेक्सिकन स्थलांतरितांचं तसं नाही. ते अमेरिकेत येतात तेच श्रमिकवर्ग म्हणून. शिक्षणही नसतं. त्यामुळे ते भारतीयांच्या तुलनेत मागे पडतात.

पण गंमत म्हणजे आफ्रिकन कसे प्राधान्याने रिपब्लिकन असतात, तसं भारतीयांचं नसतं.  असा एखाद्या विशिष्ट पक्षाचा झेंडा त्यांच्या खांद्यावर असतोच असं नाही. पण साधारण वर्गवारी करायचं म्हटलं तर बुद्धिजीवी वर्गातले.. म्हणजे प्राध्यापक, डॉक्टर किंवा अगदी अभियंतेही.. हे डेमॉक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देताना दिसतात. याउलट व्यापार उदीमाच्या क्षेत्रातली, काहीशी धार्मिक गटांनी राहणारी भारतीय मंडळी ही रिपब्लिकनांना आधार देतात. परत रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिशन अशा भारदस्त नावाची एक संघटनापण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी या संघटनेनं १५ लाख डॉलरचा निधी मिळवून दिला. आता संघटनेच्या नावातच सगळं आलं.. असो.

तेव्हा या निवडणुकीत मोठय़ा भारतीयवर्गाला आशा आहे ती हिलरी यांच्या विजयाची. एक तर त्यांना स्वत:ला भारताचं प्रेम आहे. आणि दुसरं.. आणि त्याहूनही महत्त्वाचं.. कारण म्हणजे ट्रम्प आले तर आपल्याला परत भारतात पाठवतील की काय अशी भीतीसुद्धा एका वर्गाला आहे.

मायदेशी जावं लागेल याची भीती!

आपल्यासाठी यापेक्षा अधिक टोचणारी, अधिक वेदनादायी अशी अन्य कोणती बाब असेल?

(अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या सदरास तूर्तास विराम. अध्यक्षीय निवडणुकांचे मतदान मंगळवार, ८ नोव्हेंबरला होईल. तोपर्यंत महत्त्वाचे काही घडल्यास त्याची दखल घेण्यासाठी हे सदर प्रकाशित होईल.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:32 am

Web Title: girish kuber article united states presidential election part 19
Next Stories
1 आयफोन ७ केवळ १९,९९० रूपयांत; जाणून घ्या काय आहे सत्य?
2 दंतकथा: जुनी अन् नवीही
3 लैंगिक छळ केल्याचा पाच महिलांचा ट्रम्प यांच्यावर आरोप
Just Now!
X