अमेरिकेचे अध्यक्षीय इच्छुक रिपब्लिकन श्रीमान डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ट्रम्प यांना भेटायला जाण्याचा मनोदय जाहीर व्हावा या योगायोगाकडे वाचकांचं लक्ष वेधणं हा काही या सदराचा हेतू नाही. पण तरी हा योगायोग डोळ्यावर आल्याखेरीज राहत नाही, हेही अमान्य करता येत नाही. असो.

आपण निवडून आलो तर हिंदूंना आणि भारताला व्हाइट हाऊसमध्ये त्यांचा सर्वात जिगरी दोस्त मिळेल असे ट्रम्प म्हणाले. शनिवारी न्यूजर्सीत आयोजित हिंदू मेळाव्यात त्यांनी हे कालदर्शी विधान केले. नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत, असंही ट्रम्प म्हणाले. या आधी त्यांनी ही महानता रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनाही बहाल केली होती. त्याआधी व्यवसायवृद्धीसाठी सौदी अरेबिया, दुबई इथल्या दौऱ्यात मुस्लीम्स आर ग्रेट असंही ट्रम्प म्हणाले होते. कालांतराने त्यांचा मुसलमानांविषयीचा दृष्टिकोन बदलला. आता ते त्यांना नकोसे झालेत. पण पुतिन यांच्याविषयीचं त्यांचं ते महान असल्याचं मत अजून कायम आहे. त्यात आता त्यांनी मोदी यांनाही आणून बसवलंय.

मोदी, भारत आणि हिंदू यांच्या महानतेचा साक्षात्कार त्यांना न्यूजर्सीतल्या कार्यक्रमात झाला. न्यूजर्सी म्हणजे न्यूयॉर्कच्या पलीकडचं शहर. मधून हडसन नदी वाहते. ती ओलांडली की न्यूजर्सी. या परिसरात मोठय़ा संख्येनं भारतीय राहतात. अमेरिकेत नोकरीसाठी वगैरे गेलेले. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना न्यूयॉर्क परवडत नाही. मुंबईत कुलाब्यात किंवा पुण्यात प्रभात रोडला घर न परवडणारे कसे बोरिवली, ठाण्यात किंवा पार धनकवडी, कात्रजपर्यंत जातात तसंच. लंडनजवळच्या साऊथहॉल उपनगरासारखे न्यूजर्सीतही चिक्कार भारतीय आहेत. तिथल्याप्रमाणेच इथेही ते मोठ्ठा हॉल वगैरे घेऊन गरबा खेळतात, रस्त्यांवर भांगडा करतात आणि तिथल्या कोणा मराठी घराच्या हॉलमध्ये भोंडला किंवा चैत्रागौरीचं हळदीकुंकू रंगतं. तेव्हा अशा तऱ्हेनं याच परिसरात हिंदू मेळावा व्हावा हा मात्र योगायोग नाही. इथल्याच मेळाव्यात ट्रम्प बोलले. त्यांच्या मते ते व्हाइट हाऊसमध्ये विराजमान होणं ही भारत आणि हिंदूंसाठी अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाची घटना ठरेल.

आता भारत हा फक्त हिंदूंचा आहे, असं सूचित करणारं ट्रम्प यांचं विधान शरद पवार यांना मान्य आहे की नाही, हे काही माहिती नाही. पण सर्वधर्मसमभावाचे धडे नव्यानं अभ्यासणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र ते निश्चितच अमान्य असेल. अर्थात ट्रम्प यांच्या या विधानानं साक्षी महाराज आणि काही साध्वी आदींना हर्षवायू होईल, हे बरीक खरं. किंबहुना ट्रम्प कधी सत्तेवर येतायत आणि वॉशिंग्टनातील व्हाइट हाऊसवर आपण कधी एकदा भगवा फडकवतोय, असंही या मंडळींना वाटू शकेल. परंतु पवार यांना या आनंदात सहभागी व्हायला आवडेल की नाही असा प्रश्न पडू शकतो. असो.

याआधीच्या यूएस ओपन स्तंभात रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिशन संघटनेचा उल्लेख झालाच होता. याच संघटनेच्या संमेलनात ट्रम्प सहभागी झाले होते. ट्रम्प यांच्या मते हिंदू स्थलांतरितांच्या पिढय़ान्पिढय़ांनी अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा उचललेला आहे. भारत आणि भारतीय हे अविश्वसनीय वाटावेत इतके उत्तम आहेत, असंही त्यांना वाटतं. हे छानच. पण अमेरिकेच्या जडणघडणीत फक्त भारतीय स्थलांतरितांचाच वाटा आहे, हे म्हणणं त्यांच्या अर्धसत्यान्वेषी वृत्तीचंच द्योतक म्हणावं लागेल. अमेरिकेचा अलीकडचा थोर सुपुत्र अ‍ॅपलकर्ता स्टीव्ह जॉब्स हा सीरियन स्थलांतरिताचा मुलगा. तो हिंदूही नव्हता आणि भारतीयही नव्हता. अशा असंख्यांनी अमेरिका नावाची महासत्ता बनलेली आहे. किंबहुना ती महासत्ता बनली कारण जगातल्या अशा अनेकांना तिनं आश्रय दिला म्हणून. तेव्हा फक्त एकाच धर्मीयाचं गुणगौरव गाणं हे ट्रम्प यांना शोभून दिसतं. पण तो तेवढाच गुणगौरव मोदी आणि पवार यांना मान्य आहे का, हा मुद्दा आहे.

या हिंदू अधिवेशनाआधी ट्रम्प यांची अनेक कुलंगडी बाहेर आली. जेसिका लिड्स या महिलेनं तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्या शिसारी आणणाऱ्या वासनांधतेचं सविस्तर वर्णन केलं. महिलांबाबत ते एखाद्या अष्टपाद ऑक्टोपससारखे वागले, असं काही महिलांनी त्यांचं वर्णन केलं. त्या आधी दस्तुरखुद्द ट्रम्प यांच्याच जाहीर झालेल्या ध्वनिमुद्रणातच महिलांविषयीची त्यांची मतं भल्याभल्यांना धक्का देऊन गेली. एका सामान्य पुरुषाचा असा दृष्टिकोन असता तर त्याला इतकं महत्त्व द्यायचं कारण नव्हतं. पण जगातल्या एकमेव महासत्तेचं प्रमुखपद भूषवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीची मतं इतकी मागास असणं हे काळजाचा ठोका चुकवणारं होतंच होतं. तेव्हा परस्त्रीला मातेसमान लेखायला हवं असं मानणाऱ्या हिंदू धर्मीयांच्या संघटनेनं या ट्रम्प यांचा इतका उदोउदो करावं हे भुवया उंचावणारं वाटत नसेल तर आश्चर्यच म्हणायचं. या निवडणुकीत अनेक अतिरेकी उजव्या विचारांचे ट्रम्प यांची पाठराखण करताना दिसतात. विचार उजवा की डावा हा महत्त्वाचा मुद्दा नाही. त्यातली अतिरेकी भूमिका हा आहे. असे अतिरेकी हे विचारांच्या कोणत्याही बाजूला.. डाव्या काय किंवा उजव्या काय.. असले की प्रगती खुंटते हा इतिहास आहे आणि तो वर्तमान आणि भविष्यही असणार आहे.

आणि हे काही कोणा पत्रपंडिताचं मत नाही. तर हिंदू धर्मीयांना अत्यंत वंदनीय असणारी गीतादेखील हेच सांगते. त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतो, मी उपास करून शरीराला क्लेश देणारे आणि अतिखाणारे या दोघांनाही अप्राप्य असतो. म्हणजेच प्रगती ही डाव्या-उजव्यांचा तोल आणि ताल राखत मध्यम मार्गानं जात साधायची असते. आता याचा विसर हिंदू धर्मीयांनाच पडत असेल तर काय म्हणायचं? सामान्यांचं एक वेळ जाऊ द्या, पण हिंदू धर्मीयांना तारणहार वाटणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तरी याचा विसर पडणार नाही, याची खात्री समस्त भारतीयांना समजा नसली तरी समस्त भाजपवासीयांना निश्चित असेल. असो.

त्यामुळे अत्यंत स्त्रीलंपट, करबुडव्या, वाह्य़ात, वादग्रस्त अशा ट्रम्प यांनी आपल्या सर्वोच्च नेत्याच्या केलेल्या कौतुकाचं काय करायचं या प्रश्नानं भाजपवासीयांना काळजी वाटत असेल तर ती समजून घ्यायला हवी.

पूर्वी अशी एक म्हण होती.. सोनार, कुलकर्णी, देशपांडे अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा. जातिवाचक ठरण्याच्या भीतीनं ही म्हण आता वापरणं धोक्याचं ठरेल. त्यामुळे त्यातलं बाकीचं सगळं वगळून नव्या काळाला साजेशी पुतिन, अर्दोगान, ट्रंपाप्पा.. यांची संगत नको रे बाप्पा.. असं म्हणायला काही हरकत नाही.