कै.इंदिरा गांधी यांच्या काळातल्या निवडणुकीतला हा किस्सा आहे. बहुधा १९७१ची ती निवडणूक. इंदिरा गांधी यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्या वेळी संघीय आणि समाजवाद्यांकडून आरोप झाला होता, निवडणुकांत मतघोटाळा आहे म्हणून. इंदिरा गांधी यांनी मतपत्रिकेसाठी अशी शाई म्हणे आणली होती की मतपत्रिकेवर कोणालाही मत दिलं की नंतर ती खूण अदृश्य व्हायची आणि काँग्रेसच्या चिन्हावर तोपर्यंत गुप्त असलेली शाई आपोआप प्रकट व्हायची.

अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकांत सध्या जे काही सुरू आहे आणि आजच्या शेवटच्या अध्यक्षीय चर्चेत जे काही त्याचं प्रतिबिंब पडलं त्यावरनं इंदिरा गांधी यांच्या काळातल्या या आरोपाची आठवण व्हावी. त्या वेळी इंदिरा गांधी यांच्या विरोधात एवीतेवी हरलेच असते असे विरोधक असा जादूच्या शाईचा आरोप करून त्यांचा विजय खरा नाही, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत या वेळी डोनाल्ड ट्रम्प असा आरोप करतायत. यंदाच्या निवडणुकांत मतघोटाळा आहे, असं ते जाहीरपणे म्हणालेत.

पण वास्तव काय आहे?

ते असं आहे की अमेरिकेत निवडणूक घोटाळा कदापिही शक्य नाही. ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या दैनिकानं या संदर्भात अभ्यास केला. २००० ते २०१४ या कालखंडात अमेरिकेत झालेल्या विविध निवडणुकांच्या पडलेल्या एकत्रित अशा तब्बल १०० कोटी मतांची, म्हणजे अर्थातच मतदारांचीही, त्यांनी छाननी केली. तीत आढळलं ते असं की १०० कोटी मतांत फक्त ३१ वेळा बनावट मतदान वा दुसऱ्याच्या नावे केलं गेलेलं मतदान असे कथित गैरप्रकार आढळले. देशभरात इतक्या वर्षांत फक्त ३१ गैरप्रकार. ही आकडेवारी व्यवस्थेच्या गोळीबंदतेची द्वाही फिरवते.

त्यांची व्यवस्था तशी गोळीबंद बनली कारण तीत अनवधानाने मानवी चुका होण्याची आणि जाणूनबुजून चुका केल्या जातील याची शक्यता गृहीत धरून व्यवस्थेची आखणी केली गेली, म्हणून. अमेरिकी जीवनशैलीचं.. खरं तर सगळ्याच पाश्चात्त्य.. एक वैशिष्टय़ म्हणजे माणूस हा स्खलनशील आहे हे ते मानतात. त्यामुळे उगाच जनतेच्या सज्जनतेवर विश्वास वगैरे अजागळ प्रकार नाहीत.

व्यवस्था ही अशी इतकी गोळीबंद त्यांना कशी काय करता आली? दोनच गोष्टी त्यांनी केल्या. एक म्हणजे निवडणूक यंत्रणेचं मोठय़ा प्रमाणावर विकेंद्रीकरण केलं. अमेरिकेत ५० राज्यं आहेत. म्हणजे इतक्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था तयार झाल्या. त्याचा फायदा असा की इतकी सर्व राज्यं मॅनेज करणं कोणा एकाला शक्यच नाही. त्यामुळे ट्रम्प यांना हरवण्यासाठी मतघोटाळा केला जातोय, हा आरोपच मोडीत निघाला.

आणि दुसरं म्हणजे निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती अमेरिकेनं सोपवली नाही. मतदार ओळखपत्रं तपासणं, मतदान केंद्रांची व्यवस्था, देखरेख वगैरे कामं तिथं खासगी.. म्हणजे सरकारी कर्मचारी नसलेल्या नागरिकांकडून केली जातात. जवळपास सर्व राज्यांत पक्षातर्फे  अशा नागरिकांची नावं सुचवली जातात. ही नावं सर्वच पक्षांकडनं येतात. त्यातून संतुलन साधत मग या निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तेव्हा मतघोटाळा करायचा असेल तर इतक्या सगळ्यांना भ्रष्ट करावं लागेल. आणि सरकारी वरवंटा नसल्यानं वरून आदेश आणवूनही गडबड करण्याची सोय नाही. याच्या जोडीला प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत नसलेले आणि बाहेरनं या साऱ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे यांच्याही नेमणुका केल्या जातात. इतकं सगळं झाल्यावर मतदान खुल्या जागी होतं. या जागा अशा निवडल्या जातात की तिथं कोणालाही लक्ष ठेवणं सोपं होईल. उगाच कोपऱ्यातली अंधारी अशी नगरपालिकेची शाळाच निवडली जाते असं नाही.

या सगळ्याचा अर्थ इतकाच की अमेरिकेत मतपत्रिकेत गडबड करायची सोय नाही. आता हे काय ट्रम्प यांना माहीत असणार नाही, असं थोडंच आहे? पण तरीही ते असा आरोप करतात!

त्यामागची कारणं म्हणजे एक तर त्यांचं या निवडणुकीत हरणं जवळपास नक्की आहे आणि दुसरं म्हणजे हरताना मला कसा बळी दिलं जातंय किंवा माझ्याविरोधात कसे एकवटले आहेत, हे दाखवून अधिक मतं मिळवण्याचा त्यांचा कांगावा. असे कांगावे काही प्रमाणात यशस्वी होतात. आपल्याकडेही इंदिरा गांधी यांच्याविरोधात त्या वेळी त्या जादूच्या शाईवर असंख्य नागरिकांचा विश्वास बसला होता आणि आज या वेळी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या कांगाव्यावरही अनेकांचा विश्वास बसतोय.

याचं कारण समाजात अशा कटकारस्थानांच्या कथांवर विश्वास ठेवणारे नेहमीच मोठय़ा प्रमाणावर असतात. त्यात ट्रम्प हे जनसामान्यांची, बेरोजगारांची कड घेत असल्याने त्यांचे हे दावे खरेच वाटतायत. हे ट्रम्प यांचं यश. या निवडणुकीला प्रस्थापित विरुद्ध नवशिके, आतले विरुद्ध बाहेरचे असं रूप देण्यात ते चांगलेच यशस्वी झालेत. हिलरी या आतल्या आहेत, प्रस्थापित आहेत, त्या प्रस्थापितांच्याच हिताचं रक्षण करणाऱ्या आहेत आणि मी बाहेरचा आहे, नवशिका आहे आणि व्यवस्थेनं झिडकारलेल्यांच्या हितासाठी लढणारा आहे.. असं चित्र निर्माण करण्यात ट्रम्प चांगलेच यशस्वी झालेत.

त्यामुळे ते असं चाभरटपणे बोलतायत त्यामागचं कारण हे आहे. जनतेतल्या एका वर्गाला असं भणंगपणे बोलणारे मोठय़ा प्रमाणावर आवडतात. आपल्याकडेही नामदेव ढसाळ ते अरविंद केजरीवाल अशी याच माळेतली अनेक उदाहरणं देता येतील. या अशा विधानांतून नेत्याची बेदरकार, फटकळ, अरेला कारे म्हणणारा.. अशी प्रतिमा तयार होत असते. यात एक धोका असतो. बेदरकारी कुठे संपते आणि बेजबाबदारपणा कुठे सुरू होतो, हे यातल्या अनेकांना कळत नाही.

ट्रम्प यांनाही ते कळलेलं नाही. त्याचमुळे आजच्या अखेरच्या अध्यक्षीय वादसभेत ते हिलरी क्लिंटन यांना उद्देशून नॅस्टी लेडी.. ओंगळ, तिटकारा येईल अशी बाई.. असं म्हणून गेले. याआधीच्या वादफेरीत तर आपण अध्यक्ष झालो तर हिलरी यांना तुरुंगात टाकू असंही विधान त्यांनी केलं होतं. दरम्यानच्या काळात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची तर गणतीच नाही.

हे सगळं त्या आपल्या खास मतदारांना आकर्षित करण्यासाठी. पण इतिहास असं दर्शवतो की या अशा आकर्षणाच्या मर्यादा असतात. आपल्या नेत्याचं भणंगपण अनेकांना आवडतं. पण हा नेता सतत भणंगतेचंच प्रदर्शन करत राहिला तर त्याच्या समर्थकांचा धीर सुटतो. कारण भणंगप्रियतेचा कोणी कितीही आव आणला तरी प्रत्येकाला अंतिमत: आकर्षण असतं ते भरजरी जगण्याचंच. ट्रम्प यांचं हे भान सुटलं. ते भणंगपणाच मिरवत बसले.

तात्पर्य : भणंग विरुद्ध भरजरी या संघर्षांत अंतिमत: भणंगास नांगी टाकावी लागते. हिलरी क्लिंटन यांच्या विजयानं हेच सिद्ध होईल.