अमेरिकेची प्रत्येक निवडणूक तशी आंतरराष्ट्रीयच मानली जाते, पण यंदा ती अधिक आंतरराष्ट्रीय आहे. जगातले अनेक देश या निवडणुकीकडे आपापल्या दृष्टिकोनातनं बघतायत.

म्हणजे भारतातल्या हिंदूंना डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हावेत असं वाटतंय.. कारण हाच माणूस वाढत्या इस्लामी दहशतवादाला रोखेल, अशी त्यांची धारणा आहे. तिकडे इस्लामची पवित्र स्थानं असलेल्या सौदी अरेबियात बरोबर उलटं चित्र आहे. तिथे सौदीचा राजपुत्रच ट्रम्प जिंकता नयेत यासाठी अल्लाला साकडं घालतोय. अमेरिकेचा शेजारी असलेल्या मेक्सिकोचा जीव ट्रम्प आले तर काय, या एकाच भीतीनं टांगणीला लागलाय. आपलं पेसो हे चलन ट्रम्प निवडून आले तर किती गडगडेल, याचा अंदाज घ्यायला मेक्सिकोनं आत्ताच सुरुवात केलीये आणि इकडे आशियातल्या जपानला आपल्या सुरक्षेची काळजी लागलीये. जपानचा भरवसा अमेरिकेवर असतो. पण ट्रम्प म्हणतात, जपानच्या सुरक्षेचा खर्च आपण का करायचा? या त्यांच्या प्रश्नामुळे जपानला घोर लागलाय. आणि पलीकडच्या आफ्रिकेत, ट्रम्प आले तर आपला वाली कोण, असा प्रश्न अनेकांना पडू लागलाय.

तेव्हा अशा तऱ्हेनं अमेरिकेची २०१६ची अध्यक्षीय निवडणूक खरी जागतिक बनून गेली आहे. ती जागतिक बनण्याचं आणखी एक कारण. ते म्हणजे या निवडणुकीचा निकाल. तो काहीही लागला तरी त्याच्यामागे अमेरिकेचं जागतिकीत्व हेच कारण असेल.

उदाहरणार्थ, समजा ट्रम्प निवडून आले तर त्याचा अर्थ असा की, अमेरिकेतल्या स्थानिकांनी जागतिकीकरणाकडे पाठ फिरवलीये. स्थलांतरितांची बनलेली अमेरिका यापुढे स्थलांतरितांचं स्वागत करणार नाही. आणि या निकालाचा दुसरा अर्थ असा की, अमेरिकेत स्थायिक झालेल्या आफ्रिकी अमेरिकनांनी मोठय़ा प्रमाणावर मतदानाकडे पाठ फिरवलीय. हा वर्ग २००८ साली आणि नंतर २०१२ साली मोठय़ा उत्साहात मतदानाला बाहेर पडला होता. अमेरिकेच्या अलीकडच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आफ्रिकी अमेरिकनाला अध्यक्षपदी बसण्याची संधी मिळणार होती.

तशी ती मिळालीदेखील. बराक हुसेन ओबामा अध्यक्षपदी निवडून आले आणि इतिहासच घडला. परंतु निवडून आल्यावर ओबामा यांनी आफ्रिकी अमेरिकनांसाठी अपेक्षेइतकं काम केलं नाही, अशी या मंडळींची तक्रार आहे. कधी नव्हे ते आपला माणूस आला, पण त्यानं आपल्यासाठी काही केलं मात्र नाही, अशी भावना अनेक आफ्रिकी अमेरिकीजन बोलून दाखवतात. उलट पोलिसांकडनं या आफ्रिकींवर होणाऱ्या कारवायांत ओबामा यांच्या काळात वाढच झाली. तेव्हा एक भीती अशी की, या कारणांमुळे आफ्रिकी अमेरिकी मतदार मतदानाच्या दिवशी घरातनं बाहेरच पडणार नाहीत. तसं झालं तर हिलरी यांची भलीमोठी मतपेढी त्यांच्यापासून दुरावली जाईल. म्हणजेच हिलरी हरतील.

पण त्या जिंकल्या तर त्यांच्या विजयामागचं कारणदेखील जागतिकच असेल. म्हणजे या वेळी आपल्याला आफ्रिकी अमेरिकींचा पाठिंबा कदाचित पूर्वीइतका मिळणार नाही, अशी अटकळ आधीच बांधून हिलरीबाईंनी दुसऱ्या एका सर्वात मोठय़ा स्थलांतरित अमेरिकी नागरिकांना जिंकून घेण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केलेत. हा स्थलांतरितांचा समूह म्हणजे लॅटिनो आणि हिस्पॅनिक्स नावानं ओळखले जाणारे अमेरिकी नागरिक.

युरोपातला स्पेन एकेकाळी महासत्तांमधला एक होता. जगभर त्याची सत्ता होती. अगदी लॅटिन अमेरिकेतल्या अनेक देशांतही स्पॅनिशांचंच राज्य होतं. तर अशा देशांतनं अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांना लॅटिनो म्हटलं जातं. आणि इतका थेट नाही, पण स्पॅनिश सत्तेशी ज्यांचा संबंध होता त्या देशातनं अमेरिकेत आलेले म्हणजे हिस्पॅनिक्स. अर्जेटिना, क्युबा, पोटरे रिको, पेरू, कोलंबिया, मेक्सिको, निकाराग्वा, होंडुरास, पनामा, बोलिव्हिया, चिली, एक्वेडोर.. अशा एक ना दोन अनेक देशांतनं येऊन अमेरिकेत स्थायिक झालेले लॅटिनो आणि/किंवा हिस्पॅनिक्स या नावांनी ओळखले जातात.

यातले अनेक जण बेकायदेशीर स्थलांतरित आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कसलीच कागदपत्रं नाहीत. तरीही त्यातल्या अनेकांना अमेरिकेनं नागरिकत्व दिलंय. जेवढय़ांना दिलंय त्यापेक्षा अधिक या नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ट्रम्प यांचं म्हणणं असं की, ते जर सत्तेवर आले तर अशा सगळ्या लॅटिनो, हिस्पॅनिक्सना ते अमेरिकेतनं हाकलून देतील. अशी कागदपत्रं नसलेल्या स्थलांतरितांची संख्या कित्येक लाखांत आहे. तेव्हा या सगळ्यांना आपल्याकडे वळवण्याचं पद्धतशीर काम हिलरी यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांत अशी अनधिकृतपणे स्थलांतरित होऊन आलेली एक महिलाच उच्चपदावर नेमलीये. हेतू हा की यातनं योग्य तो संदेश जावा.

तसा तो गेलाय, असं आत्तापर्यंत जिथं जिथं मतदान सुरू झालंय तिथलं चित्र आहे. लॅटिनो, हिस्पॅनिक्स प्रचंड संख्येनं मतदानाला बाहेर पडलेत. अगदी रांगा लावून ते मतदान करतायत. गेल्या दोन निवडणुकांत ज्यांच्या मतांची टक्केवारी दहा-बाराच्या वर कधी गेली नाही त्या लॅटिनो/हिस्पॅनिक्स यांच्या मताचं प्रमाण आजच्या घडीला तब्बल ७५ टक्क्यांवर गेलंय. ते अजूनही वाढेल.

यातली बहुतांश मतं हिलरी क्लिंटन यांना जातील, अशी चिन्हं आहेत. तसं घडलं तर अर्थातच हिलरी क्लिंटन या निवडून येतील. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प पराभूत होतील. याचाच अर्थ हिलरी यांचा विजय किंवा ट्रम्प यांचा पराभव या दोन्हीमागे कारण असेल ते आंतरराष्ट्रीयच. म्हणूनच २०१६ची ही अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक ही आतापर्यंतच्या निवडणुकांच्या तुलनेत अधिक आंतरराष्ट्रीय ठरते.