पक्ष्याचं अंड फोडलं म्हणून पाच वर्षाच्या चिमुरडीला खाप पंचायतीने घरात प्रवेश करु न दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी खाप पंचायतीच्या १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी खाप पंचायतीने हुकूम सोडल्यापासून चिमुरडीला घराबाहेर एका शेडमध्ये राहण्यास भाग पाडण्यात आलं. इतकंच नाही तर मुलीच्या आई-वडिलांसहित गावकऱ्यांना तिला स्पर्श न करण्याचा आदेश देण्यात आला.

‘मुलीने चुकून टिटवी पक्षाचं अंड फोडलं होतं. गावकऱ्यांना नंतर या गोष्टीची माहिती मिळाली. अनेक गावकरी टिटवी पक्षाला शुभ मानतात. त्याच्यामुळे चांगला पाऊस पडतो आणि सर्व अडथळे दूर होतात अशी त्यांची श्रद्धा आहे’, अशी माहिती हिंदोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सिंह यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीने चिमुरडीला तिच्याच घरात प्रवेशबंदी केली. मुलीचं कुटुंब आणि खाप पंचायतीचे सदस्य एकाच समाजातून असून अनुसुचित जातीतील आहेत. खाप पंचायीतने मुलीच्या कुटुंबियांना तुम्हाला पापातून मुक्त व्हायचं असेल तर धार्मिक विधी करावेत असा अजब आदेशही देऊन टाकला आहे.

‘आम्हाला माहिती मिळताच तात्काळ तिथे पोहोचलो. सुरुवातीला तपास केला असता गेल्या १० दिवसांपासून मुलगी आपल्या घरात गेली नसून पंचायतीने आदेश दिल्यापासून शेडमध्ये राहत असल्याचं समोर आलं’, अशी माहिती लक्ष्मण सिंह यांनी दिली. चिमुरडी इयत्ता पहिलीत शिकत असून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत मुलीला तिच्या घरात प्रवेश करुन दिला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजस्थान मानवाधिकार आयोगाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला १९ जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि निंदनीय असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. मुलीच्या कुटुंबियाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीने पैसे आणि दारुचीही मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.