तिचा जन्म हीच एक बंडखोरी होती, नक्षलवाद्यांचे जे कडक नियम असतात, त्यात जंगलात मुले होऊ दिली जात नाहीत, पण तिचे नशीब म्हणून ती नक्षलवाद्यांच्या अबुजामाद या अड्डय़ांवर जन्माला आली. तिचे वडील लंका पापा रेड्डी यांना मूल हवे होते, त्यांनी प्रेमाने तिचे नाव तेजस्वी असे ठेवले. एका मंगळवारी पहाटे एक वाजता तिने हैदराबादहून चीनला प्रयाण केले. पाच वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करायला ती तेथे गेली आहे, लवकरच ती डॉक्टर बनून येईल. चीनच्या पूर्वेकडील हेबेई प्रांतात हेबेई विद्यापीठामध्ये ती दाखल झाली असून तेथे डॉक्टरकीचे शिक्षण घेत आहे. माओवाद्यांच्या दंडकारण्यात जन्मलेली तेजस्वी आता नक्षलवाद्यांपैकी परदेशात शिकलेली एकमेव मुलगी ठरेल.
रेड्डी यांनी नंतर शरणागती पत्करलेली आहे. हणमकोंडा येथील निवासस्थानी ते सांगत होते की, तिच्यासाठी मी मित्रांशी लढलो, ती एक दिवस चीनला जाईल असे वाटले नव्हते, सुरुवातीला तर तिला वाढवायचे कसे हा प्रश्न होता. ती दोन वर्षांची झाली तेव्हा जंगलातील आयुष्य तिच्यासाठी योग्य नाही असे त्यांना वाटले व रेड्डी जंगलातून पसार झाले. गोदावरी पार करून तिच्यासह ते वारंगळला आले व तिथे तिला कुटुंबाकडे ठेवले. पुन्हा त्यांची भेट होणार की नाही हे माहीत नव्हते. नंतर २००८ मध्ये रेड्डी माओवादी (सीपीआय) समितीचे सदस्य होते तेव्हा एकदा तेजस्वीला भेटले होते, पण त्यांनी व्यक्तीगत कारणास्तव शरणागती पत्करली. प्लॅटून कमांडर सरोजा हिनेही शरणागती पत्करली. रेड्डींच्या आईने त्यांच्या मुलीला वाढवले. तिने आईवडिलांची पाश्र्वभूमी तिला सांगितली नाही. रेड्डी परत आले तेव्हा सणासारखा उत्सव साजरा झाला. त्यांना घरातल्या सर्वानी ओळखले. त्यांचे घराणे राजकीय पाश्र्वभूमीचे होते. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते व ते स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होते. रेड्डी १९८० मध्ये नक्षल चळवळीत आले. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर सगळी कहाणी सांगितली, त्यावेळी तेजस्वी १४ वर्षांची होती. तिने वडिलांना मुळीच नाकारले नाही.
तेजस्वीला सुरुवातीला चित्रपटनिर्माती व्हायचे होते पण लोकांची सेवा करण्यासाठी तिने डॉक्टर होण्याचे ठरवले.
वारंगळचे अनेक जण चीनला शिकत होते म्हणून तीही चीनला जायला निघाली, हैदराबाद विमानतळावर वडील तिला सोडायला आले होते तेव्हा त्यांनी तिला सांगितले, विसरू नकोस तुला लोकांची सेवा करायचीय. लॅटिन अमेरिकेतील क्रांतिकारक अलेदा गव्हेरा तिचा आदर्श होता व वडील आदर्श होते.
त्या काळात रेड्डी तिला रोज दोनदा स्काइपवर भेटत असत. ती जेव्हा हैदराबादमध्ये मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारी करीत होती तेव्हा ते तिच्यासाठी चिकन घेऊन जात असत. आता ते ४८ वयाचे आहेत. मुलगी डॉक्टर होऊन परत येईल पण ती पुन्हा जंगलात जाणार नाही. नक्षलवादी बनणार नाही पण सामान्य लोकांची सेवा मात्र करेल याचा त्यांना विश्वास आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2014 1:16 am