पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत वारंवार होणारा गोळीबार थांबण्याचे काही नाव घेत नाही, पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात गेल्या पंधरा दिवसांत चारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यातच ताज्या घटनेत पुंछ येथे रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून यात एक स्थानिक मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्यांनी शहापूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर हल्ला चढवला. त्याचबरोबर सीमेलगतच्या गावांवरही गोळीबार करण्यात आला. याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहनाज बानो (वय १५, रा. शाहपूर) ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संरक्षण प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने सातत्याने छोट्या रायफल्सद्वारे गोळीबार तसेच उखळी तोफांचा माराही केला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता, त्यांनतर संध्याकाळी ६ वाजण्याचा सुमारास पाकिस्तानकडून राजौरीतील मांजाकोटे सेक्टरमध्ये पुन्हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

नव्या वर्षात १८ ते २२ जानेवारी दरम्यान, पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात अनेक जण मृत्युमुखी तर ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जम्मू, कथुआ, सांबा, पुंछ आणि राजौरी भागात या गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या.