१७ वर्षांच्या एका मुलीने अर्धशिशीचा त्रास होतो म्हणून उपचारांसाठी हॉस्पिटल गाठले. मात्र तिथे डॉक्टरांपुढे तिने आपली व्यथा बोलून दाखवली, वडिल लैंगिक छळ करत असल्याचे या मुलीने डॉक्टरांना सांगितले. मुलीने आपल्याला काय भोगावे लागते आहे हे सांगितल्याने तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटली. ही मुलगी बिहारची आहे, दिल्लीतील सफदरजंग या ठिकाणी असलेल्या सरकारी रूग्णालयातल्या डॉक्टरांना तिने वडिलच आपला लैंगिक छळ करत असल्याचे सांगितले. रात्री सगळेजण झोपल्यावर माझे वडिल माझा लैंगिक छळ करतात. गेल्या काही वर्षांपासून हे सुरु आहे आणि जेव्हा मी हे कोणालाही सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझे वडिल मला मारतात अशीही तक्रार या मुलीने केली.

दिल्लीत ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय येत असतात. या दरम्यानच्या प्रवासात माझ्या वडिलांनी माझे काही आक्षेपार्ह फोटो काढले आहेत असेही या मुलीने डॉक्टरांना सांगितले. पहिल्यांदा माझ्यासोबत जेव्हा हा प्रकार घडला तेव्हापासून मला अर्धशिशीचा त्रास होतो असेही या मुलीने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी या सगळ्या प्रकाराची तातडीने दखल घेत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या मुलीच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला आहे. पोस्को कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांची या संदर्भात चौकशी सुरु केली आहे.

काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, वडिलांकडूनच लैंगिक छळ झाल्यास मुलीच्या मनावर मोठा आघात होतो. तसेच तिला अर्धशिशी होणे किंवा इतर कोणताही आजार सतावू शकतो. अनेकदा मुले नैराशाच्या गर्तेत जातात, आयुष्य संपवून घेतात असेही मानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. लैंगिक छळाच्या ३९ टक्के प्रकरणांमध्ये पीडित मुलीच्या ओळखीचेच लोक सामील असतात. तर २०१६ मध्ये दिल्ली पोलिसांनी लैंगिक छळ किंवा बलात्काराची ८४ टक्के प्रकरणे घरातच झाल्याची माहिती समोर आल्याचे म्हटले आहे.