गर्लफ्रेंड भेटायला आली नाही म्हणून संतापलेल्या २३ वर्षीय आयटी इंजिनिअरने स्वत:ची महागडी सेडान कार पेटवून दिली. गुजरातच्या वडोदरा शहरात मंगळवारी ही घटना घडली. शहरातील आरसी दत्त रोडवरील बॉम्बे शॉपिंग सेंटरच्या मागच्या बाजूला असलेल्या गल्लीत युवकाने त्याची कार पेटवून दिली.
युवकाने प्रथम दगडाने सेडान कारच्या काचा फोडल्या. नंतर रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करुन गाडीमध्ये भरला व कारला आग लावली. रस्त्यात उभे राहून हा सर्व प्रकार पाहत असलेल्या गर्दीवर सुद्धा या युवकाने दगड फेकून मारले. गाडीने पेट घेतल्यानंतर स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
युवकाने दुसऱ्याच्या गाडीला आग लावलीय असा सुरुवातीला समज झाला होता. पोलीस त्याला अटक करण्यासाठी पोहोचले होते. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याने स्वत:चीच गाडी जाळल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांना त्याला सयाजीगुंज पोलीस स्थानकात घेऊन जायचे होते. पण त्याने आधी नकार दिला. अखेर ऑटोरिक्षामधून येण्यासाठी तो तयार झाला.
युवक पोलीस ठाण्यात काही बोलायला तयार नव्हता. पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून घेतल्यानंतर त्याने तोंड उघडले. गर्लफ्रेंड भेटायला आली नाही म्हणून संतापाच्या भरात गाडी जाळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ती मुलगी कोण आहे?काय करते? याबद्दल माहिती देण्याचे त्याने टाळले. वडिलांना गुन्हा नोंदवायचा नसल्यामुळे पोलिसांना त्या युवकाला सोडावे लागले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2020 8:48 am