News Flash

मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी

देशातील सुमारे २७ कोटी जनतेला मनमोहन सिंग यांनी दारिद्र्य रेषेतून बाहेर काढलं

मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी
मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी केली आहे. देशातील सुमारे २७ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढल्याने मनमोहन सिंग या पुरस्काराचे मानकरी असल्याचं घोष यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उपस्थित केला आहे.

घोष यांनी म्हटलं की, भारताचे १३वे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं नुकतचं निधन झालं तेव्हा मनमोहन सिंग आपल्या माजी सहकार्याची प्रशंसा करताना थांबत नव्हते. त्यांनी मुखर्जी यांना स्वतंत्र भारतातील महान नेत्यांपैकी एक म्हटलं आहे. घोष पुढे म्हणाल्या, प्रणव मुखर्जींनी दीर्घकाळ सरकारमध्ये असणं ही एक असाधारण गोष्ट आहे. मात्र, एक प्रश्न असाही आहे की, मनमोहन सिंग हे आपल्या सहकाऱ्याच्या तुलनेत भारतरत्नसाठी अधिक योग्य आहेत?

मनमोहन सिंग सन १९९१ मध्ये जेव्हा अर्थमंत्री बनले, तेव्हा त्यांनी अनेक बदल घडवून आणले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी दशकांपासून सुरु असलेल्या मजबूत नियंत्रित अर्थव्यवस्थेला मुक्त केले. २००६ ते २०१६ दरम्यान २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढले. या काळात मोठ्या कालावधीसाठी मनमोहन सिंग हेच देशाचे पंतप्रधान राहिले. भारतातील करोडो लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. आत्ताच्या गरिबांसाठीच्या अनेक योजना जशा वित्तीय समावेशन, मनरेगा आणि आधार कार्ड त्यांच्याच कार्यकाळातील देणं आहे, असं घोष यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

त्याचबरोबर, भारतात अर्थमंत्र्यांवर कायमच काही कॉर्पोरेट कुटुंबांच्या जवळ असल्याचा आरोप होत राहिला आहे. मात्र, मनमोहन सिंग यांच्यावर कधीही जातीयवाद किंवा कोणत्याही विशिष्ट व्यावसायिक कुटुंबांशी संबंध असल्याचा आरोप झाला नाही. भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील मंत्र्यांना अनेकदा निशाणा बनवण्यात आलं, मात्र, विरोधकांनी त्यांच्यावर कधीच वैयक्तिकरित्या भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाला राजकीय जीवनापासून दूर ठेवलं आहे, त्यामुळे ते राजकीय क्षेत्रासाठी एक आदर्श आहेत, मनमोहन सिंग यांची अशी स्तुती घोष यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 5:16 pm

Web Title: give bharat ratna award to dr manmohan singh demand of senior journalist aau 85
Next Stories
1 खळबळजनक! जमिनीच्या वादातून माजी आमदार मिश्रा यांची हत्या; हल्ल्यात मुलगाही जखमी
2 Video : “तुमच्यासारखी मानसिकता महिलांच्या शोषणासाठी जबाबदार”; कंगनाचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
3 आई तू परत ये….! केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक
Just Now!
X