गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये माझ्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी आणि मला पक्षाने इतर कोणतीही जबाबदारी द्यावी, असे आनंदीबेन पटेल यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पटेल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळेच त्या विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत असा अंदाज व्यक्त होतो आहे. २०१४ मध्ये आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यांनी ४ ऑगस्ट २०१६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा ‘फेसबुक’वरून दिल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती.

‘माझे आता वय झाले आहे त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे’, असेही पटेल यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या ३१ वर्षांपासून मी भाजपसाठी काम करते आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मला कायमच सन्मानाची वागणूक मिळाली. तसेच मला कायम त्यांची साथ लाभली. राजकारणात जेव्हा खचून जाण्याचे काही प्रसंग आले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला कायम लढण्याचे बळ दिले. आगामी गुजरात निवडणुकांमध्ये मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी आनंदाने स्वीकारेन असेही त्यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट केले. तसेच आयुष्यभर भाजपसाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले.