पाकिस्तानातील एका लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याकरिता भारताला आणखी एक संधी द्यावी, असा आदेश इस्लामबाद उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्याचे पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पाकिस्तानने ‘परिणामकारक आढावा घेऊन फेरविचार करावा’, असा आदेश हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) जुलै २०१९ मध्ये दिला होता.

जाधव यांच्याकरिता वकील नेमण्याबाबत पाकिस्तान सरकारने केलेल्या याचिकेची मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला व न्या. मियाँगुल हसन औरंगजेब यांनी सुनावणी केली. आयसीजेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत आपली जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून जाधव यांच्यासाठी वकील नेमावा, अशी विनंती सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयाला केली.

लष्करी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका करण्यास किंवा त्यासाठी अर्ज करण्यास जाधव यांनी नकार दिल्याचा दावाही सरकारने केला. फेरविचार याचिकेबाबतच्या निर्णयाबद्दल भारत सरकार किंवा जाधव यांनी पुन्हा विचार करावा, तसेच वकील नेमण्यासाठी भारताला एक संधी दिली जायला हवी, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. त्यावर, या संदर्भात आम्ही परराष्ट्र कार्यालयामार्फत भारताशी संपर्क साधू, असे अ‍ॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी सांगितले.