म्यानमारमधील निर्वासितांना मानवतावादी दृष्टिकोनातून देशात आश्रय द्यावा, अशी विनंती मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असल्याचे शनिवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. म्यानमारमधून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखावे आणि निर्वासितांचे वेगाने प्रत्यार्पण करावे हा केंद्र सरकारने दिलेला आदेश स्वीकारार्ह नसल्याचे झोरामथांगा यांनी म्हटले आहे.

म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात लष्कराने सत्ता काबीज केल्यानंतर अनेक पोलिसांसह शेकडो निर्वासित मिझोराममध्ये आले आहेत. म्यानमारमधील चिन समुदायातील निर्वासितांचे मिझोराममधील जनतेशी वांशिक संबंध आहेत, त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडून देता येऊ शकत नाही, असे झोरामथांगा यांनी म्हटले आहे.  झोरामथांगा यांनी १८ मार्च रोजी मोदी यांना पत्र लिहिले असून निर्वासितांना मानवतावादी दृष्टिकोनातून आश्रय देण्यासाठी मोदींनी वैयक्तिक स्तरावर मध्यस्थी करावी, अशी विनंती केली आहे.