नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, केंद्रीय निवडणुक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दिल्लीचे मतदार यंदा अरविंद केजरीवाल यांनाच पसंती देणार की राज्यात कमळ फुलणार याबद्दलचे आराखडे बांधले जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेकडे अनोखी मागणी केली आहे.

“आम्ही जी विकासकामं केली आहेत, त्यावरच आम्ही मतं मागणार आहोत. जर आम्ही गेल्या ५ वर्षात तुमची कामं केली असं वाटत असेल तरच आम्हाला मत द्या. जर तुम्हाला वाटत असेल तरच आम्हाला सत्तेत पुन्हा येण्याची संधी मिळायला हवी”, निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या ५ वर्षांत आम्ही दिल्लीच्या शाळांची, रुग्णालयांची परिस्थिती सुधारली आहे. सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाल्याचंही केजरीवालांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलत असताना केजरीवालांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. “दिल्लीत अमित शाह यांनी केलेलं भाषण ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. ते आम्ही केलेल्या कामांबद्दल बोलतील, आम्हाला अजुन कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल बोलतील असा आमचा अंदाज होता. मात्र त्यांच्या भाषणात ते सतत आमच्यावर टीकाच करत होते.” आगामी काळात सामन्य दिल्लीकरांच्या घरापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचं केजरीवालांनी यावेळी स्पष्ट केलं.