कोलंबिया अंतराळयानाच्या ज्या दुर्घटनेत भारतीय वंशाची अंतराळ वीरांगना कल्पना चावला हिच्यासह सात अंतराळवीरांचा दहा वर्षांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला, त्या वेळी कोलंबिया स्पेस शटलमध्ये बिघाड माहीत असूनही त्याबाबत काही करता येणे शक्य नव्हते हा नासा अधिकाऱ्यांचा दावा नासाचेच वैज्ञानिक वेन हेल यांनी फेटाळला आहे.
स्पेस शटलच्या पंखात समस्या आहे हे मोहीम नियंत्रकांना माहीत होते पण तो दोष किरकोळ समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला. उड्डाण संचालक असलेले वेन यांनी सांगितले, की कोलंबिया स्पेस शटलच्या पंखातील दोष गंभीर असेल तर काय करता येईल याची उपाययोजना आपण त्या वेळी वरिष्ठांना सांगितली होती पण त्यावर काहीच कृती करण्यात आली नाही.
स्पेस शटलचा पंख खूपच सदोष बनला होता कारण उड्डाणावेळीच त्याच्या फोम आवरणाचा टवका उडाला होता.  हेल यांच्या मते कोलंबिया यानाच्या पंखाला उड्डाणावेळीच मोठी हानी पोहोचल्याची माहिती नासाला होती, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करता आले असते, असे असले
तरी वेळ खूप कमी होता. त्यामुळे कोलंबिया यानाची दुर्घटना टाळणे शक्य नव्हते हे हारपोल्ड यांचे म्हणणे अगदी अयोग्य होते असेही नाही.
हेल यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, की कोलंबिया यानाच्या पंखाला छिद्र पडले होते व ते बुजवण्यासाठी काय करता आले असते यावर चौकशीच्या वेळी विचार करण्यात आला पण त्यातील एकही उपाय त्यात लागू पडला नसता.
त्या वेळी एकच करता आले असते ते म्हणजे अतिशय अवघड असा स्पेसवॉक करीत ते छिद्र लगेच शोधून कोलंबिया यान बचावात्मक पातळीवर आणून अ‍ॅटलांटिस स्पेस शटल पाठवून या अंतराळवीरांची सुटका करता आली असती.
कोलंबिया यानाच्या या दुर्घटनेत मरण पावलेल्या अंतराळवीरांमध्ये डेव्हीड ब्राऊन, रिच हजबंड, लॉरेल क्लार्क, कल्पना चावला, मायकेल अँडरसन, विल्यम मॅककुल, इलन रॅमन यांचा समावेश होता.