सीरम इन्स्टिट्यूटने ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे पहिले १० कोटी डोस भारत सरकारला एका विशेष किंमतीला विकण्याचा निर्णय घेतला आहे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदर पूनावाला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या १० कोटी करोना प्रतिबंधक लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २०० रुपये असणार आहे.

सरकारच्या विनंतीवरुन ही किंमत निश्चित करण्यात आली आहे, असे अदर पूनावाला यांनी सांगितले. खासगी बाजारात सीरम हीच लस १ हजार रुपयांना विकणार आहे. “भारत सरकारच्या विनंतीवरुन आम्ही लसीचे पहिले १० कोटी डोस २०० रुपयांना देणार आहोत. आम्हाला सामान्य माणसाला, गरीबांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करायची आहे. १० कोटी लसीचे डोस दिल्यानंतर खासगी बाजारात या लसीची किंमत १ हजार रुपये असेल” असे अदर पूनावाला यांनी सांगितले.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सहा कंटेनर रवाना करण्यात आले. त्यानंतर आता १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस घेऊन जाण्यासाठी तीन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची विमान सज्ज झाली आहेत.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून लस देशभरात पोहोचवली जाणार आहे. आज (१२ जानेवारी) एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे ५६.५ लाख डोस वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. यात पुण्यातून विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.