मनमोहन सिंग यांना पुरस्कार
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना जपानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून भारत-जपान संबंधात मोठी प्रगती केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना ‘ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ द पॉलोवनिया फ्लॉवर्स’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे, असे जपानी दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे. जपानमधील हा सर्वोच्च पुरस्कार असून वेगळी कामगिरी करणाऱ्यांना तो देण्यात येतो. जपानच्या सरकार व जनतेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराने आपला खरा सन्मान झाला आहे, असे मनमोहन सिंग यांनी त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. २०१४ मध्ये ५७ परदेशी व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

बलात्कारासाठी फाशीची शिफारस करणार
बेंगळुरू- बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची शिफारस कर्नाटक सरकार करणार असल्याचे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री उमाश्री यांनी येथे सांगितले. कर्नाटकातील शाळांमध्ये अलीकडे अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे अनेक प्रकार घडले असून त्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत असतानाच उमाश्री यांनी बलात्काऱ्यांना फाशी देण्याची शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले. ही शिफारस केंद्र सरकारला केली जाणार आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, बलात्काराची प्रकरणे कठोरपणे हाताळण्यात यावीत असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण मंत्रालय गृह मंत्रालयाला अशा प्रकरणांमध्ये सहकार्य करील असे आश्वासनही त्यांनी दिले. गेल्या काही महिन्यात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या चार घटना बंगळुरू येथे घडल्या आहेत.

लष्करी जवानाची आत्महत्या
हैदराबाद- मेहदीपटनम भागात लष्कराच्या एका जवानाने रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. लान्स नायक अप्पला राजू असे त्याचे नाव असून पहाटे चार वाजता त्याने आत्महत्या केली. संरक्षण विभागाच्या प्रवक्तयाने सांगितले की, त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत तो मरण पावला होता. त्याच्याकडे आत्महत्येबाबत कुठलीही चिठ्ठी सापडली नाही. हुमायन नगर पोलिस व लष्करी अधिकारी याबाबत चौकशी करीत आहेत.

प्राणिशास्त्र केंद्र स्थापन करणार
नवी दिल्ली- भारतातील प्राणिसंग्रहालये व दक्षिण आशियातील प्राणिसंग्रहालये यांची वैज्ञानिक पद्धतीने देखभाल करण्यासाठी सरकार प्राणिसंग्रहालय केंद्र स्थापन करणार आहे, असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. विद्यापीठांप्रमाणे या केंद्रातही संबंधित विषयाचे अध्यापन, संशोधन, प्रयोग यांना प्राधान्य राहणार आहे. हे केंद्र दिल्लीत स्थापन केले जाणार आहे. जागतिक प्राणीसंग्रहालये व मत्स्यालये जागतिक संघटनेच्या वार्षिक परिषदेनंतर जावडेकर बोलत होते. हे केंद्र केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सल्लागार म्हणून काम करील असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

युक्रेनमध्ये बंडखोर नेत्याची सरशी
डोनेस्क- युक्रेनमधील वादग्रस्त निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनुसार बंडखोर नेते अलेक्झांडर झाखरचेन्को हे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यात जमा आहेत. त्यांनी स्वत:ला डोनेस्क प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून यापूर्वी घोषित केले होते. त्यांना अध्यक्षीय निवडणुकीत ८१.३७ टक्के मते पडली असून त्यांच्या पक्षाला ६५ टक्के मते पडली आहेत असा दावा करण्यात आला आहे.

बिल गेट्स यांची देणगी
वॉशिंग्टन- अमेरिकेचे दानशूर उद्योगपती बिल गेट्स यांनी विकसनशील देशातील मलेरिया व इतर संसर्गजन्य रोगांचा मुकाबला करण्यासाठी ५०० दशलक्ष डॉलरची देणगी जाहीर केली आहे. इबोला या रोगाबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसन अँड हायजिन या संस्थेच्या न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या बैठकीत गेट्स फाउंडेशनतर्फे त्यांनी ही देणगी जाहीर केली. मलेरिया, न्यूमोनिया, अतिसार या रोगांवर उपचारांसाठी ही रक्कम खर्च व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेट्स फाउंडेशनने मलेरियाचा मुकाबला करण्यासाठीची रक्कम ३० टक्के वाढवली आहे. गेट्स यांनी पश्चिम आफ्रिकेत ४९०० बळी घेणाऱ्या इबोला या रोगाबाबत चिंता व्यक्त केली व जागतिक आरोग्य इतिहासात हा चिंताजनक काळ असल्याचे सांगितले.

कमरूझमान यांची फाशी वैध
ढाका- जमात-ए- इस्लामीचे नेते व १९७१ च्या बांगलादेश युद्धातील गुन्हेगार असलेले महंमद कमरूझमान यांनी फाशीच्या शिक्षेविरोधात केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाच्या चार सदस्यीय अपील मंडळाने फेटाळले असून शिक्षा वैध ठरवली आहे. विशेष लवादाने मे महिन्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. जमाते इस्लामीचे नेते मतीउर रहमान निझामी व मीर कासीम अली यांना याच आठवडय़ात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अपिलाच्या निकालात चार पैकी एका न्यायधीशाने कमरूझमान याना जन्मठेप देण्याचे मत व्यक्त केले होते. उत्तर शेरपूर येथे १६४ लोकांचे हत्याकांड केल्याचा आरोप कमरूझमान यांच्यावर होता. या शहराला आता ‘बिढोबा पाली’ असे नाव असून तेथील अनेक विवाहित तरूणांना ठार करण्यात आल्याने ते विधवांचे शहर म्हणून ओळखले जात होते.